
मोबाईल गेमिंगचे वेड किती जीवघेणे ठरू शकते याचे एक भयानक उदाहरण मेरठमध्ये पाहायला मिळाले आहे. येथे ऑनलाईन गेम खेळत असताना एका 22 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेम खेळत असताना अचानक त्याचा रक्तदाब वाढला आणि त्याच्या डोक्याची नस फाटल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद कैफ (22) असे त्या तरूणाचे नाव असून तो मेरठमधील खैरनगर गूलरचा निवासी होता. शुक्रवारी रात्री मोहम्मद आपल्या खोलीत बसून हेडफोन लावून गेम खेळत होता. गेल्या तीन चार महिन्यांपासून तो सतत पबजी हा गेम खेळायचा, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. रात्रभर गेम खेळत असताना रात्री 3 वाजता अचानक तो बेडवरून खाली पडला. त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी मोहम्मदला तातडीने दवाखान्यात नेले. त्यांची तब्येत फारच नाजूक होती.
दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला सुरूवात केली. त्यावेळी मोहम्मदचं ब्लड प्रेशर 300 पार गेला होता. त्याची तब्येत फारच खराब होत चालली होती. त्यामुळे त्याला तातडीने दिल्लीतील एका रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मोहम्मदचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, अत्यधिक ताण आणि उत्साहामुळे रक्तदाब वाढला, ज्यामुळे ब्रेन हेमरेज झाले. आणि मोहम्मदचा मृत्यू झाला.
























































