
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेतील कुख्यात मानवी तस्कर व सेक्स स्कँडल्सचा सूत्रधार जेफ्री एपस्टिनशी संबंधित फाइल्स चर्चेत आहे. या फाईल्समध्ये अनेक दिग्गजांच्या नावाचा उल्लेख आहे. याप्रकरणातील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टिनशी असलेल्या संबंधांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी देखील जेफ्री एपस्टिनशी असलेल्या आपल्या संबंधांच्या चर्चांचे खंडन केले आहे.
अमेरिकेच्या पहिल्या महिला मेलानिया ट्रम्प यांनी गुरुवारी एका विशेष निवेदनाद्वारे जेफ्री एपस्टिनशी असलेल्या आपल्या संबंधांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या या बातम्या पूर्णपणे खोट्या असून हा त्यांची बदनामी करण्याचा एक प्रयत्न आहे. अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांकडे नैतिकतेचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
एपस्टिन किंवा त्याची सहकारी मॅक्सवेल यांच्याशी त्यांची कोणतीही वैयक्तिक मैत्री नव्हती. न्यूयॉर्क आणि फ्लोरिडा येथील सामाजिक कार्यक्रमांमध्ये केवळ एकाच वर्तुळात वावरत असल्यामुळे त्यांची ओळख होती. मॅक्सवेलला पाठवलेला ईमेल हा केवळ एक अनौपचारिक पत्रव्यवहार होता. त्याचा कोणताही वेगळा अर्थ काढला जाऊ नये, असे मेलानिया ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी मेलानिया ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसला एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. एपस्टिनच्या गुन्ह्यातून वाचलेल्या महिलांसाठी सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी, जेणेकरून त्या आपली बाजू मांडू शकतील आणि त्यांचे म्हणणे अधिकृत रेकॉर्डवर घेतले जाईल, अशी मागणी त्यांनी केली. प्रत्येक महिलेला आपली गोष्ट जगासमोर सांगण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
एकीकडे जगभरात इराण इस्त्रायल अमेरिका यांच्यातील युद्धाचा भड़का उडला असताना दुसरीकडे मेलानिया यांनी केलेल्या विधानामुळे एपस्टिन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपल्या वकिलांच्या मदतीने आपण या निराधार आरोपांविरुद्ध कायदेशीर लढा देत असून, सत्याचा नक्कीच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.






























































