
गुढीपाडव्याचे औचित्य साधून गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने ‘मुंबईचा राजा आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. 19 ते 22 मार्च या कालावधीत हा फेस्टिव्हल होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे. या माध्यमातून हिंदू नववर्ष शोभायात्रा स्वागत सोहळा, दर्यापती शिवराय प्रदर्शन, संगीत नाटय़, लाईव्ह कॉन्सर्टस्, फोक मॅशअप असे विविध उपक्रम होतील. त्याचबरोबर खवय्यांसाठी चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्पॉट पेंटिंग, शिल्पकला व खरेदीसाठी विविध स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
19 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुंबईचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून शोभायात्रा स्वागत सोहळा होईल. त्यानंतर भव्य ऐतिहासिक प्रदर्शनासाठी ‘दर्यापती शिवराय’ हे दालन खुले करण्यात येईल. या दालनात छत्रपती शिवरायांच्या आरमारी नीतीचा, युद्धनौकांचा आणि जलदुर्गांचा गौरवशाली इतिहास उलगडणारे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. 20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता ‘गोष्ट वारीची’ हे संगीत नाटय़, 21 मार्च सायंकाळी 6 वाजता गायक आदित्य नीला निर्मित ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ व 22 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता ‘फोक मॅशअप’ असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ
आर्ट फेस्टिव्हलद्वारे कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे पहिले मंडळ आहे. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून लोप पावत चाललेली गिरणगाव संस्कृती व महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱया दुर्मिळ फोटोंचे ऩदर्शन देखील भरवण्यात येणार आहे. फेस्टिव्हलमध्ये जवळपास 45 कलाकारांनी सहभाग घेतला असून त्यात जेजे आर्टस्, रहेजा
कॉलेजमधील विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांचा समावेश असल्याची माहिती मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी दिली.






























































