
झाडे सजीव असतात. त्यांनाही संवेदना असतात. तीसुद्धा आजारी पडतात, पण त्या आजाराचे निदान होत नाही. हेच निदान आता केले जाणार आहे. मुंबईतील झाडांचे सीटी स्कॅन केले जाणार आहे. रक्तचाचणीसारखेच झाडांचेही नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यात त्या झाडाला काही रोग झालाय का याचे निदान होऊन त्यावर उपचार दिले जाणार आहेत.
मुंबईतील झाडांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सखोल तपासणी करण्याचा पायलट प्रकल्प मुंबईतील आर मध्य आणि एच पश्चिम या भागात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर पालकमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी दिली. आशीष शेलार यांच्या दालनात यासंदर्भात बैठक झाली. त्या बैठकीला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई उपनगरांतील प्रत्येक झाडाचे डिजिटल मॅपिंग, आरोग्य तपासणी आणि व्यवस्थापन करण्याची संपूर्ण प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे शेलार म्हणाले.
अशी आहे प्रक्रिया…
अद्ययावत लायडर तंत्रज्ञानाद्वारे झाडांचे थ्रीडी इमेजिंग करून त्यांचे अचूक डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येईल. ह प्रत्येक झाडाचा स्वतंत्र डिजिटल कोड तयार होऊन त्यामध्ये झाडाच्या वाची माहिती, कार्बन शोषण क्षमता, प्रदूषण कमी करण्यातील योगदान, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि इतर पर्यावरणीय फायदे नोंदवले जातील.
मुंबई उपनगरातील सर्व झाडांचे वय, प्रजाती, आरोग्यस्थिती, फांद्यांची वाछाटणीची आवश्यकता, तसेच झाडांमुळे होणारे पर्यावरणीय फायदे याची सविस्तर माहिती या तपासणीत उपलब्ध होणार आहे.
झाडांच्या आतील स्थितीची तपासणी करण्यासाठी रेझिस्टोग्राफसारखी आधुनिक उपकरणे वापरण्यात येणार आहेत. त्याच्या सहाय्याने झाड न कापता त्याच्या खोडातील कुजलेला भाग, पोकळी किंवा आतील नुकसान अचूकपणे ओळखता येते.






























































