मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररीतील एसी बंद, वातानुकूलित यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची युवासेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच महिन्यांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कलिना पॅम्पसमधील सुसज्ज लायब्ररीच्या एसीच्या केबल चोरी गेल्या होत्या. अजूनही एसीची सेवा पूर्ववत कार्यरत झालेली नसल्यामुळे विद्यार्थी उकाड्याने हैराण होत आहेत. त्यामुळे लवकारत लवकर एसी सुरू करा, अशी मागणी युवासेनेने कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 8 जुलै 2022 रोजी सुसज्ज इ लायब्ररी सुरू करण्यात आली होती. या लायब्ररीतील एसीच्या केबल पाच महिन्यांपूर्वी चोरीला गेल्या. आज पाच महिने होऊन गेले तरी चोरांवर कारवाई झाली नाही तसेच एसीदेखील पूर्ववत सुरू झाल्या नाहीत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारीची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचडे, परमात्मा यादव, मयूर पांचाळ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन दिले आहे. लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून एसी तातडीने पूर्ववत करावी अशी आग्रही मागणी केली आहे. लवकरच यासंदर्भात युवासेना सिनेट सदस्य कुलगुरूंची भेट घेणार आहेत.