Vijay Hazare Trophy – हंगामातील तिसऱ्या जेतेपदासाठी मुंबई सज्ज

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने नुकताच सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद काबीज केले. त्यानंतर आता एकदिवसीय प्रकारातही मुंबईचा संघ छाप पाडण्यास सज्ज आहे. शनिवारपासून देशभरातील विविध शहरांत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे 32 वे पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईला हंगामातील तिसऱया जेतेपदाची संधी असून या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबईसमोर कर्नाटकचे कडवे आव्हान असेल.

मार्चमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी स्पर्धा जिंकली होती, मात्र त्याचा समावेश 2023-24 च्या हंगामात केला जातो. ऑक्टोबर महिन्यात इराणी चषकाद्वारे यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरू झाला. त्यामध्ये मुंबईनेच अजिंक्यच्या नेतृत्वात बाजी मारली. त्यानंतर मग श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने 15 डिसेंबर रोजी मुश्ताक अली करंडक उंचावला. आता 21 डिसेंबर ते 18 जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या विजय हजारे स्पर्धेत जेतेपद मिळवल्यास मुंबईची यंदाच्या हंगामातील जेतेपदाची हॅटट्रिक साकारली जाईल. तसेच रणजीचा 2024-25 चा हंगामही अद्याप सुरू असून विजय हजारे स्पर्धेनंतर दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

दरम्यान, श्रेयसच्या मुंबईच्या संघातून पृथ्वी शॉला डच्चू देण्यात आला आहे. 2020-21 मध्ये पृथ्वीच्याच नेतृत्वात मुंबईने विजय हजारे स्पर्धा जिंकली होती. तसेच मुश्ताक अली स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या रहाणेला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर असे हिंदुस्थानी संघाकडून खेळणारे खेळाडू मुंबईचा भाग आहेत. त्याशिवाय आयुष म्हात्रे, तनुष कोटियन, सूर्यांश शेडगे या युवा खेळाडूंवरही लक्ष्य असेल. अनुभवी सिद्धेश लाडचे संघात पुनरागमन झाले आहे. मुंबई-कर्नाटक लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सकाळी 9 वाजता सुरू होईल. मयांक अगरवाल कर्नाटकचे नेतृत्व करणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप कसे?

विजय हजारे स्पर्धेत 38 संघांचा समावेश असून त्यापैकी पहिल्या तीन गटांत प्रत्येकी 8, तर नंतरच्या दोन गटांत प्रत्येकी 7 संघांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातील आघाडीचे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील, तर दुसऱ्या क्रमांकावरील संघांना उपउपांत्यपूर्व फेरीत खेळावे लागेल. स्पर्धेच्या साखळी फेऱ्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार नाही. मात्र बाद फेरीपासून ‘स्पोर्ट्स 18 वाहिनी’ व ‘जिओ सिनेमा ऍप’वर थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

  • गटवारी
  •  अ-गट ः हरयाणा, गुजरात, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, गोवा, आसाम, मणिपूर.
  •  ब-गट ः महाराष्ट्र, राजस्थान, सेनादल, रेल्वे, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, मेघालय, सिक्कीम.
  • क-गट ः मुंबई, कर्नाटक, हैदराबाद, सौराष्ट्र, पंजाब, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड.
  • ड-गट ः विदर्भ, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, चंदिगड, जम्मू आणि कश्मीर, मिझोराम.
  • इ-गट ः बंगाल, केरळ, दिल्ली, त्रिपुरा, मध्य प्रदेश, बडोदा, बिहार.

मुंबईचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, रॉयस्टन डायस, जुनेद खान, हर्ष तन्ना, विनायक भोईर.