
महापालिकेची निवडणूक लढवायची असेल तर दोन अपत्यांपेक्षा जास्त असतील त्या उमेदवाराला निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे, परंतु नागपुरात एका महिला उमेदवाराला चक्क चार अपत्ये आहेत. तरीही या महिलेचा अर्ज निवडणूक प्रशासनाने मंजूर केला आहे. यामुळे ही महिला निवडणूक रिंगणात आहे. या महिलेचा प्रचारसुद्धा जोरात सुरू आहे. अर्ज मंजूर झाल्याने निवडणूक आयोगातील प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे, तर उमेदवार महिला म्हणतेय, निवडणूक लढवण्यासाठी किती मुले हवी आहेत याचा नियम मला माहितीच नव्हता, असे म्हटले आहे.
दक्षिण-पश्चिम नागपुरातील प्रभाग 36 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा मुकेश वाघमारे या उमेदवार यांना चार अपत्ये असताना त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक प्रशासनाकडून मंजूर झाला आहे. या महिला उमेदवाराने स्वतःच्या प्रतिज्ञापत्रात 4 अपत्यांची माहिती दिली आहे. त्यातील दोन अपत्यांचा जन्म 12 सप्टेंबर 2001 नंतर झाल्याचेही नमूद केल्याचा दावा पुष्पा वाघमारे यांनी केला आहे. नियमांनुसार अर्ज छाननी प्रक्रियेतच त्यांचा अर्ज बाद होणे अपेक्षित होते, मात्र तरीसुद्धा त्याचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे मनपा निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. उमेदवाराने अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 2 जानेवारीपर्यंत होती. महानगरपालिकेने सर्व पात्र उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र 6 जानेवारी रोजी संकेतस्थळावर अपलोड केले आहेत. वेळेत माहिती उपलब्ध नसल्याने आक्षेप घेण्याची संधी इतर उमेदवारांना मिळू शकली नाही.
मला नियमच माहिती नाही
चार अपत्ये असताना तुम्ही निवडणूक रिंगणात कशा, असा प्रश्न विचारल्यानंतर पुष्पा वाघमारे म्हणाल्या की, मला यासंदर्भातील नियमाची माहितीच नव्हती. जर मला योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर अर्ज भरला नसता, असे पुष्पा वाघमारे यांचे म्हणणे आहे. प्रतिज्ञापत्राची सखोल पडताळणीच झाली नाही. ही उमेदवाराची नव्हे तर निवडणूक प्रशासकीय चूक आहे.































































