
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी अधिकाधिक नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून अनुयायांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. यानुसार पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मील परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरातील स्वच्छतेच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक सत्रामध्ये 220 कामगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्वच्छतेसाठी प्रत्येक सत्रामध्ये 225 कामगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा महिला अनुयायांच्या सुविधेसाठी पिंक टॉयलेटची व्यवस्था 4 ठिकाणी करण्यात आली आहे. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांची वाहनेही तैनात करण्यात आली आहेत.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
सुरक्षेच्या अनुषंगाने चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सीसीटीव्ही कॅमेरा, फिरता कॅमेरा आणि मेटल डिटेक्टर, बॅग स्पॅनर यासारख्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष आणि निरीक्षण मनोऱ्याची उभारणीही करण्यात आली आहे. तसेच 2 अग्निशमन वाहने, अतिदक्षता रूग्णवाहिका, 4 बोटी आदींची व्यवस्थादेखील केली आहे.
12 विशेष लोकल धावणार
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने या वर्षीही अतिरिक्त लोकलची व्यवस्था केली आहे. पूर्व उपनगरात राहणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल या मार्गांवर या विशेष रेल्वे धावणार आहेत. आंबेडकरी जनतेची गैरसोय टाळून त्यांना बिनदिक्कत चैत्यभूमीवर येता यावे, यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
रांगेत आसन व्यवस्था, बाटलीबंद पाणी, बिस्किटे
अनुयायांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याच्या दृष्टीने आरओ प्लांटची व्यवस्था सहा ठिकाणी करण्यात आली आहे. त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे 530 नळ, पाण्याचे 70 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
समवेत स्नानगृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची बाटली आणि बिस्किटेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच रांगेत आसन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.