
शीख बांधवांचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर सिंग हे देशाची एकता, स्वातंत्र्य आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी शहीद झाले होते. त्याची जाणीव ठेवून जुन्या दिल्लीतील दिल्ली जंक्शन या रेल्वे स्थानकाचे नाव शीश गंज साहेब किंवा नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचे नाव ‘गुरु तेग बहादूर’ असे ठेवावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली आहे.
गुरु तेग बहादूर यांचा दिल्ली जंक्शनजवळच्या शीश गंज साहेब या गुरुद्वाराच्या ठिकाणी शिरच्छेद करण्यात आला होता, तर नवी दिल्ली रेल्वे स्थानकाजवळच्या गुरुद्वारा रकाब गंज येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे गुरु तेग बहादूर यांना खऱया अर्थाने आदरांजली समर्पित करायची असेल तर या दोनपैकी एका रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मी संसदेत केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण
नोव्हेंबर 1675 मध्ये गुरु तेग बहादूर हे शहीद झाले होते. या घटनेला नुकतीच 350 वर्षे पूर्ण झाली. दिल्लीत ज्यावेळी शीखविरोधी दंगली झाल्या त्यावेळी महाराष्ट्रात शिखांच्या केसालाही धक्का लागायला नको, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. ही आठवण माझ्या मनात होती. त्यामुळे मी ही मागणी केली आहे, असे अरविंद सावंत म्हणाले.




























































