
नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमधील आणखी एका भोंदूबाबाचे प्रकरण समोर आले आहे. निफाड धारणगाव येथील गणेश जगताप या बाबावर बलात्कार, फसवणूक, अॅट्रॉसिटीचे सात गुन्हे दाखल असूनही राजकीय वरदहस्तामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॅप्टन खरात प्रकरणापासून धडा घेत गुप्तधनाचे आमिष दाखवून आजवर शेकडो कुटुंबीयांना लुबाडणाऱ्या आणि अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱया या बाबावर सरकार वेळीच कठोर कारवाई करणार का, असा सवाल आता नाशिककरांनी उपस्थित केला आहे.
आपल्याकडे दैवी शक्ती आहे असे भासवून जमिनीतून सोने काढून देणे, पैशांचा पाऊस पाडणे असे आमिष दाखवून गणेश जगताप या बाबाने अनेकांना कोटय़वधी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख यांनी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. याच बाबाविरोधात पंधरा वर्षे लैंगिक शोषण करून सुमारे पन्नास लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी पीडित महिलेने तीन महिन्यांपूर्वी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बलात्कार, अॅट्रोसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, मात्र तीन महिन्यांत गणेश जगतापला एकदाही चौकशीसाठी बोलावले नाही. उलट हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवून तो मोकाट फिरतोय, असा आरोप संजय देशमुख यांनी केली आहे. या बाबाच्या डोक्यावर अशा कोणत्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे ज्याच्या दबावाखाली पोलीस आणि प्रशासन लाचार झाले आहे, असा सवाल करत अध्यात्म, चमत्कारिक शक्ती व अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांना लुबाडणाऱया गणेश जगताप आणि त्याच्या कामाख्या माता ट्रस्टची सखोल चौकशीची मागणी देशमुख यांनी केली आहे.
जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी
दैवी चमत्कार आणि तांत्रिक विधीच्या नावाखाली फसवणूक करणाऱया गणेश जगताप या बाबावर जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर कलमे लावावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक आणि निफाड शाखेतर्फे इंदिरा नगर पोलिसांकडे यापूर्वीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
56 कोटी रुपये खर्चून कामाख्या मंदिर उभारले, निमंत्रितांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची नावे
गणेश जगताप या बाबाने 56 कोटी रुपये खर्च करून निफाडमध्ये कामाख्या मातेचे भव्य मंदिर उभारले आहे. 20 ते 28 मार्च या दरम्यान होणाऱया या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी त्याने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची निमंत्रितांमध्ये नावे आहेत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

























































