मध्यरात्री फोन, ऑपरेशन सिंदूरमुळे मोठे नुकसान; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली

ऑपरेशन सिंदूरनंतर सुरू झाल्यापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हिंदुस्थानवर हल्ला केला. मात्र या कारवाईला हिंदुस्थानी सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईवर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोठे विधान केले आहे. कालपर्यंत अपयशी असूनही स्वत:ला युद्धाचा राजा समजणाऱ्या पाकने आपला पराभव स्वीकारला आहे. हिंदुस्थानच्या हवाई दलाने नूर खान एअरबेस आणि इतर तळांवर हल्ले करून ते नेस्तनाबूत केल्याचे शाहबाज शरीफ यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि जनरल असीम मुनीर यांच्यात फोनवर संवाद झाल्याची कबुली स्वत: शरीफ यांनी दिली. 9-10 मे च्या रात्री सुमारे अडीच वाजता जनरल सय्यद असीम मुनीर यांनी मला फोन केला. यावेळी हिंदुस्थानने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नूर खान एअरबेस आणि इतर काही भागात डागली आहेत, अशी माहिती त्यांनी मला दिली. आमच्या हवाई दलाने आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. पण हिंदुस्थानने चिनी लढाऊ विमानांविरोधात आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला, असे शरीफ म्हणाले.

दरम्यान, हिंदुस्थानकडून पराभव झाला तरी पाकड्यांची स्वत: श्रेय देण्याची खुमखुमी कमी झालेली नाही. पराभव स्वीकारला तरी हिंदुस्थानला आपण कसं घाबरवलं याच्यावर खोटो दावे केले. आज सर्वत्र चर्चा आहे की, पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थान कसे प्रत्युत्तर दिले. आमच्या सैन्याने पठाणकोट, उधमपूर आणि इतर अनेक ठिकाणी हल्ला केला. यावेळी त्यांनी शत्रूंना लपण्यासाठी जागा सोडली नाही, असे अर्थहीन वक्तव्य शरीफ यांनी केले. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा त्यांना ट्रोल केलं जात आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान पुढे म्हणाले की, “सकाळी मी पोहायला गेलो होतो. यावेळी मी माझा फोन सोबत घेऊन गेलो. जनरल असीम मुनीर यांनी मला फोन करून सांगितले की आपण हिंदुस्थान्यांना योग्य उत्तर दिले आहे आणि आता ते युद्धबंदी करू इच्छितात, याबद्दल तुमचे काय मत आहे? मी म्हणालो – यापेक्षा मोठे काय असू शकते. तुम्ही शत्रूला युद्धबंदी करण्यास भाग पाडले आहे. मला वाटते की तुम्ही विलंब करू नये आणि युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारावा, असा खोटा दावा  शाहबाज शरीफ यांनी केला.