आत्म्यांनी मला आदेश दिला की…, 11 वीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कुटुंबात छठ पूजा साजरी होत असताना, कुटुंबातल्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपले जीवन संपवण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली. आत्म्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे, असे तरूणाने नोटमध्ये लिहिले आहे. मृत विद्यार्थ्याचे वडील आलोक मिश्रा हे जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांचे पुतणे आहेत.

मृत मुलगा हा 11 वीचा विद्यार्थी होता. कानपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुसाईड नोटमध्ये असे म्हटले आहे की मुलाला भूत,आत्म्यांची भीती होती. हे आत्मे त्याला त्याच्या कुटुंबाला मारण्यासाठी किंवा स्वत: आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यामुले त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे नोटमध्ये लिहिले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ती नोट जप्त केली आहे आणि तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जुन्या कानपूरमधील कोहना भागात घडली. जिथे आलोक मिश्रा त्याची पत्नी दिव्या, मुलगी मान्या आणि 16 वर्षांचा मुलगा आरव हे राहत होते. आरव 11 वीत शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला खूप एकट वाटत होते. त्याला विचित्र आणि अज्ञात गोष्टींची भीती वाटू लागली होती. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, दिवाळीच्या आधी आरवने त्याच्या बहिणीला सांगितले होते की त्याला भयंकर स्वप्न पडत आहेत. त्याच्या स्वप्नात आत्मे येतात आणि ते त्याला वाईट गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात. मात्र त्यावेळी कुटुंबाने त्याचे बोलणे गांभीर्याने घेतले नाही.

छट पूजेच्या दिवशी घरी कोणी नसताना आरवने शेवटी टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी केलेल्या तपासात आरवने सुसाईड केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.