
गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील उपलेटा येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीची पत्नी कर्करोगाने ग्रस्त असून ती गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळलेली आहे. आईच्या हतबलतेचा फायदा घेत हा नराधम बाप स्वतःच्याच मुलीचे शोषण करत होता. अखेर पीडित मुलीने घरातून पळ काढल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,19 वर्षीय पीडित मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली. तिच्या पित्यानेच पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर उपलेटा पोलीस आणि राजकोट ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने शोध मोहीम राबवून मुलीचा शोध लावला. मात्र, जेव्हा पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली, तेव्हा तिने जे सांगितले ते ऐकून पोलिसही हादरून गेले. तिने आपल्या बेपत्ता होण्यामागे वडिलांकडून होणारा छळ हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिची आई चौथ्या स्टेजच्या कॅन्सरने आजारी पडली आणि अंथरुणावरून हालचाल करणे अशक्य झाले, तेव्हापासून तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. ती अल्पवयीन असतानाच हा प्रकार सुरू झाला होता. आरोपी बाप रात्रीच्या वेळी तिच्यावर जबरदस्ती करायचा आणि कोणालाही काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी द्यायचा. पीडितेने सांगितले की, अत्याचार करताना तिचा ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तो टीव्हीचा आवाज मोठा करायचा आणि अश्लील व्हिडिओ लावून तिच्यावर अतिप्रसंग करायचा.
पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आरोपी बापाला ताब्यात घेतले आणि त्याची सखोल चौकशी केली. सुरुवातीला नकार देणाऱ्या आरोपीने अखेर पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्या खोलीतून मोबाईल फोन आणि अन्य काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.





















































