
‘जेन-झी’ने पुकारलेल्या आंदोलनानंतर इराण पेटला आहे. सरकारविरोधी देशव्यापी निदर्शनांदरम्यान 217 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. इराणच्या सुरक्षा दलांनी आंदोलन चिरडण्यासाठी अनेक ठिकाणी गोळीबार केला. आपल्या मुलांना आंदोलनापासून लांब ठेवा, गोळी लागल्यास तक्रार करू नका, असा इशारा रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. तेहरानमध्ये निदर्शकांनी अल रसूल मशीद पेटवून दिली. यानंतर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला. तेहरानमधील एका डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, राजधानीतील केवळ सहा रुग्णालयांमध्ये किमान 217 निदर्शकांचा मृत्यू नोंदवला गेला आहे.
खोमेनी कधीही देश सोडतील – ट्रम्प यांचा दावा
अमेरिका आणि इस्रायल हे आंदोलनाला भडकावण्यात मदत करत आहेत, असा इराणचा आरोप आहे. इराणने आपले हवाई क्षेत्र बंद करत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. इंटरनेटही बंद केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी कधीही देश सोडून पळून जाऊ शकतात.































































