मोनेगिरी- रमणिक आणि श्रीधर उद्योजक

>> संजय मोने 

व्यवसाय, उद्योग मोठा करण्यासाठी आवश्यक असते ती चिकाटी, श्रम आणि कामाबाबतची प्रामाणिकता. या गोष्टी त्या त्या व्यवसायाची आणि ते अमलात आणणाऱया माणसाची ओळख ठरवतात. रमणिक आणि श्रीधर यांच्यात ही ओळख सार्थ करण्यात कोण यशस्वी ठरते हे काळच ठरवतो.

सकाळी 4.30चा गजर झाला. बाहेर पावसाने थैमान घातलं होतं. आदल्या दिवशी दुपारी जो सुरू झाला तो थांबायचं नाव घेत नव्हता, उलट वाढतच चालला होता. गाडय़ा वगैरे बंद झाल्या होत्या. रस्ते नदीसारखे दुथडी भरून वाहत होते. रमणिक या सगळ्या परिस्थितीत चिकाटीने उठला. अंगातला आळस त्याने एक आळोखापिळोखा देऊन समोरच्या भिंतीवर फेकून दिला. चहाचं आधण तापवलं. उकळी येईपर्यंत खसाखसा  दात घासले. मग आरामात तो झालेला चहा प्यायला. मग त्याने स्वच्छ दाढी केली. ती झाल्यावर आरशासमोर पुढे झुकून मिशीचा आकार नीट केला. चेहरा वळवून त्याने कानशिलावर उगवलेले दोन-चार चुकार पांढरे केस कापून टाकले. सगळा चेहरा त्याला हवा तसा दिसल्यावर त्याने आफ्टरशेव लोशन लावलं आणि त्याने घडय़ाळात बघितलं. पाच वाजले होते. आता वेळ बघायला मोबाईल सुरूच केला होता म्हणून एक अॅप उघडून त्यात कालच्या खरेदी विक्रीचे आकडे बघितले. सुमारे पंधरा मिनिटं त्यात घालवून त्याने आंघोळ करायची तयारी केली. ती करताना आपल्या बायकोला त्याने हलवून उठवलं

“हेतल!आजे नास्तो शुं छे?’’

हेतल उठली. पंधरा मिनिटांत तिचं सगळं दैनंदिन कार्य तिने उरकलं. रमणिक कालच्या शेअर बाजारची हालहवाल बघत होता. अचानक त्याच्या नाकात स्वयंपाकघरातून आलेला सुगंध दरवळला.

“हेतल! खाटा धोकळो? तो एने साथें चटणी?’’

आतून हेतलचा आवाज आला

“कालेच तैयारी किदिथी!’’

रमणिक प्रेमात आला. त्याने आत जाऊन हेतलला मिठी मारली.

“बस कर हवे! दुकान खोलवानो छे के नथी?’’  हेतल म्हणाली.

खरं तिला रमणिकने मारलेली मिठी आवडली होती, पुढे काय होऊ शकतं हेही तिला माहीत होतं, पण ती एका उद्योजकाची पत्नी होती. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ती गुजरातच्या एका तालुक्यातून लग्न होऊन मुंबईत आली होती. शिक्षण जवळपास नाहीच, फक्त विश्वास एवढाच की, मी माझं आयुष्य यांच्याबरोबर जोडून घेतलंय. त्यामुळे या क्षणिक मोहाला बळी पडून पुढचं सगळं बिघडून द्यायचं नव्हतं.

चारचा गजर ऐकून श्रीधर उठला. अख्ख्या मुंबईची अवस्था बिकट होती. पाऊस पडतच होता. पडत म्हणजे वाढतच होता. पहिल्यांदा त्याने हात लांब करून गजर बंद केला आणि त्याने कूस बदलली. त्याच्या मनात विचार आला, एवढय़ा पावसात जाऊन दुकान उघडायचं? कोण येणार खरेदी करायला? बाजूलाच झोपलेल्या छायाला त्याने मिठीत घेतलं.

“आज दुकान उशिराच उघडा. पावसात कशाला जाताय?’’

“मग काय करायचं?’’ श्रीधरने मादक आवाजात विचारलं. त्यावर छाया त्याच्या मिठीत घट्टपणे शिरली.

एव्हाना रमणिक दुकान उघडायला लागला होता.  पाऊस पडत होता. त्याच्या दुकानाच्या बाहेर पाण्याचं मोठं थारोळं झालं होतं. दुकानातून खराटा घेऊन तो ते पाणी गटाराच्या दिशेने ढकलू लागला. इकडे श्रीधरने छायाला बाजूला केलं, ती पुन्हा त्याला लगटून मिठी मारायला लागली.

“छाया! दुकान उघडायला पाहिजे. जायला पाहिजे.’’

“श्रीधर सामंत यांचं दुकान बाजूलाच आहे ना? अजून उघडलं नाही का ते?’’ रमणिकच्या नुकत्याच उघडलेल्या दुकानासमोर येऊन एक माणूस चौकशी करत होता.

“नाही! ते जरा उशिरा उघडतात बऱयाच वर्षांपासून त्यांचं दुकान आहे. त्यामुळे…’’ रमणिक काय सांगणार?

त्याच वेळी “ऐका ना! एक चांगला चित्रपट लागलाय. संध्याकाळी जाऊ या का?’’ छायाने श्रीधरला पुन्हा एकदा मिठी मारत विचारलं.

“तू म्हणतेस तर जाऊ या. मग आज दुकान बंद ठेवतो.’’

“सामंतांच्या दुकानातलं तुम्हाला काय पाहिजे? जे पाहिजे ते मला सांगा. तुमच्या घरी  पोचेल ते.’’

“अहो! स्वतच्या सासरच्या लोकांना ते पोचवत नाहीत, आम्हाला काय पोचवणार?’’ गिऱहाईक चिडून म्हणालं.

“ते नाहीच पोचवणार! मी पोचवतो. पत्ता सांगा.’’

“म्हणजे त्याचे वेगळे पैसे लावणार तुम्ही?’’

“नाही. शेजारी आहे तो माझा. कधीतरी माझी वस्तू तो पोचवेल. आता काही दिवसांनी बाजूलाच अजून दोन दुकानं उघडणार आहेत. दिवाळीच्या आसपास.’’

“म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन निर्माण होणार!’’

“मी गुजराती असून तुमच्याशी मराठीत बोलतोय आणि तुम्ही प्रयत्न करून इंग्रजी ऐकवताय. तेव्हा तुम्ही मराठी असणार असा माझा अंदाज होता. साहेब! स्पर्धा होणार नाही आमच्यात. उलट एक चार दुकानांची छोटी बाजारपेठ निर्माण होईल. मराठी भाषेत सांगायचं तर मार्केट होईल छोटंसं.’’

रमणिक म्हणाला ते गिऱहाईकाला पटलं नाही. त्याहीपेक्षा इतकं इंग्रजी झाडूनसुद्धा आपण मराठी आहोत हे समोरच्याला जाणवलं याची नाराजी किंवा राग जास्त होता. नेमकं त्याच वेळी श्रीधरने घरी आपल्या कपातला तिसरा चहा संपवला.

“छाऊ! राणी! काहीतरी मस्त बनव ना आपल्याला खायला! पटकन, गरमागरम.’’ श्रीधर दाढी करायला जाताना म्हणाला. “नाहीतर. मागवतो काहीतरी मस्त! मिसळ मागवू? की डोसाबिसा?’’

“काहीही चालेल, पण भरपूर मागव. तू दुकान उघडलंस तरी दुपारपर्यंत परत येशील ना? तेव्हा परत कोण स्वयंपाक करणार उरलेलं गरम करून खाऊ!’’

हे सगळं बोलणं झाल्यावर श्रीधर डुलत डुलत दुकानाकडे निघाला. आल्यावर त्याने शांतपणे आजूबाजूला पाहिलं. समोरच्या फुटपाथवर त्याचं मित्रांचं टोळकं उभं होतं. तो तिकडे जायला निघाला.

“अरे श्रीधर! तुझ्याकडे एक ऑर्डर आलीय. होम डिलिव्हरी आहे. हे बघ!’’असं म्हणून रमणिकने एक यादी त्याला दिली.

“बघू रे नंतर. आधी एक मस्त चहा मारतो. तुला पाहिजे?’’ श्रीधर म्हणाला आणि रस्ता ओलांडायला लागला.

“नाही, आता जेवायचं रे!  तू आणलाय काय डब्बा?’’ रमणिकने विचारलं.

“नाही! मी मागवलंय. थोडय़ा वेळाने दुकान उघडून बंद करणार. मस्त पाऊस पडतोय. मजा करणार. तू काय करणार?’’ श्रीधर बेफिकिरीने म्हणाला.

“आपला मज्जा नु लाईफ फक्त सोमवारी.’’ असं म्हणून रमणिक नुकत्याच आलेल्या गिऱहाईकाकडे वळला. श्रीधर हसून आपल्या मित्रांत रममाण झाला. रमणिक आपल्या दुकानात व्यग्र झाला.

आता रमणिक बाजूची तीन दुकानं घेऊन मस्त विक्री करू लागला. श्रीधरने आपलं दुकान रमणिकला चालवायला दिलं. त्याला चाळीस-पन्नास हजार रुपये भाडं मिळतं. यात तो संसार चालवायचा प्रयत्न करत असतो. दिवस कसा घालवायचा हा त्याच्या पुढे एक यक्षप्रश्न उभा राहिलेला आहे आणि रमणिक दिवसभर दुकान ö आता दोन दुकानं- चालवून ऐटीत राहतो. तोही आता पाचöसहा माणसं नोकरीला ठेवून फक्त पाच-सहा तास दुकानात येतो.साधारण दीड-दोन लाख रुपये एवढं त्याचं उत्पन्न आहे. नुकतीच त्याने चाळीतली बाजूची दोन घरं विकत घेतली. नजीकच्या काळात जर त्याची चाळ पुनर्बांधणीसाठी गेली तर त्याला मोठ्ठी जागा मिळेल आणि बहुधा श्रीधर मिळालेली जागा विकून मराठी माणसाची राजधानी असलेल्या बदलापूरच्या आसपास राहायला जाईल.

[email protected]