
एमसीजीवर सुरू होणारा चौथा कसोटी सामना हिंदुस्थानच जिंकणार, अशी भविष्यवाणी खुद्द रवी शास्त्री यांनी केलीय. बॉक्सिंग डे कसोटी कोणत्या दिशेने धावणार याची दिशा कसोटीचा पहिला दिवस ठरवेल, असेही भाकीत त्यांनी वर्तवले. बॉर्डर-गावसकर करंडक मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून उभय संघ कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी विजयाच्या प्रयत्नात आहेत. ज्या थरारक पद्धतीने कसोटी मालिका पुढे सरकतेय, त्यानुसार हिंदुस्थानचा संघच एमसीजी जिंकणार, असा विश्वास शास्त्राr यांनी बोलून दाखवला. एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे आणि आता हिंदुस्थानचा संघ आघाडी घेण्याच्या मार्गात आघाडीवर आहे. हिंदुस्थान इथे जिंकण्यासाठी आलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी संघाकडे एक विचारपूर्वक योजना असणे गरजेचे असते. त्यांच्याविरुद्ध केवळ खेळणे पुरेसे नसते. जेव्हा मी प्रशिक्षक होतो तेव्हाही आमचा मंत्र निर्भिडपणे खेळणे आणि जिंकणे हाच होता.