
सोशल मीडियावरील एक रील शेअर करणे एखाद्या व्यक्तीसाठी किती महागडू शकते, याचे उदाहरण जयपूरमध्ये समोर आले आहे. जयपूरमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनवारी छेडवाल याने गोसेवकांबद्दल एक आक्षेपार्ह रील बनवली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि जमावाने त्याला भरबाजारात मारहाण केली. या रीलमुळे निर्माण झालेल्या संतापामुळे संतप्त तरुणांनी बनवारीला त्याच्या दुकानातून ओढत बाहेर काढले आणि संपूर्ण बाजारात त्याची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 17 डिसेंबर रोजी जयपूरच्या तुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. बनवारी छेडवाल आपल्या चपलांच्या दुकानात बसलेला असताना अचानक काही तरुण तिथे पोहोचले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. आरोपींनी बनवारीला दुकानातच बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याची कॉलर धरून त्याला अनवाणी पायाने बाजारात फिरवले. यावेळी लोकांनी मध्यस्थी करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली, तर दुसरीकडे बनवारीकडून जाहीर माफीही मागायला लावली.
वादाचे मुख्य कारण बनवारीने शेअर केलेली एक रील होती, ज्यामध्ये त्याने गोसेवकांविरुद्ध अत्यंत अभद्र आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. “गोसेवा करण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांची काळजी घ्या, जे घरी उपाशी मरत आहेत,” असे त्याने या रीलमध्ये म्हटले होते. इतकेच नाही तर, आपण गोसेवेवर अभ्यास करत असून अनेक गोसेवकांचे सत्य जवळून पाहिले असल्याचा दावाही त्याने केला होता. त्याने गोसेवकांच्या कुटुंबीयांबद्दलही हीन दर्जाची टिप्पणी केली होती आणि देणगीच्या पैशातून अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता.
या वादग्रस्त विधानामुळे स्थानिक तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. घटनेची माहिती मिळताच तुंगा पोलिसांनी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सध्या या भागात तणाव शांत झाला आहे





























































