पेन्शन योजना सुधारणा तातडीने करा… अन्यथा तीव्र आंदोलन! नाबार्डचे निवृत्त कर्मचारी आक्रमक

नाबार्ड निवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शनबाबतचे प्रश्न आणि इतर मागण्या तातडीने पूर्ण करा, अन्यथा 5 जानेवारीपासून शहर आणि रिजनल कार्यालयांसमोर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया नाबार्ड रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे. नाबार्ड कर्मचार्यांच्या प्रश्नांबाबत आज असोसिएशनच्या वतीने शहर आणि रिजनल ऑफिसच्या ठिकाणी प्रलंबित प्रश्नांबाबत निषेध व्यक्त करीत सादरीकणासह माहिती देण्यात आली.

नाबार्ड भरती, निवृत्तीवेतन सुधारणा, सरकारने मंजूर केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन सुधारणेतील विलंब आणि इतर निवृत्ती वेतनविषयक प्रश्नांच्या पुर्ततेसाठी ऑल इंडिया नाबार्ड रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नाबार्ड कर्मचार्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहेत. कुटुंब निवृत्तीवेतन पुनरावलोकनास मंजुरी मिळून 30 महिने उलटूनही नाबार्ड व्यवस्थापनाने प्रत्यक्ष वाढ लागू केलेली नाही. आरबीआयच्या धर्तीवर ’अप्पर सीलिंग’ काढून टाकण्याबाबतही कारवाई झालेली नाही. अत्यल्प निवृत्तीवेतनावर जगणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबीयांना यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. व्यवस्थापनाने त्यांच्या यातनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी नाराजी संघटनेचे अध्यक्ष यु.के.मोहंती यांनी व्यक्त केली.