‘सामना’च्या यूटय़ूबला मिळालं ‘सिल्व्हर बटण’; संजय राऊत यांच्या हस्ते अनावरण

दैनिक ‘सामना’चे वेबपोर्टल Saamana.com ने दमदार कामगिरी करत यूटय़ूबवर नुकताच 1 लाख सबस्क्राइबरचा टप्पा पार केला आहे. यानंतर यूट्यूबने ‘सामना’च्या चॅनेलला ‘सिल्व्हर बटण’ प्रदान केले आहे. दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या हस्ते या ‘सिल्व्हर बटण’चे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रबोधन प्रकाशनचे संचालक विवेक कदम उपस्थित होते. अनावरण सोहळ्यादरम्यान सामना ऑनलाईनची टीम आणि कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करताना संजय राऊत म्हणाले की आता ‘सामना’चं लक्ष्य हे ‘गोल्डन बटण’ असेल. गोल्डन बटण मिळवण्यासाठी ‘सामना’ची संपूर्ण टीम आता अधिक वेगानं कामाला लागेल, अशी अपेक्षादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, यूट्यूबवर ‘सामना’ चॅनेलचे सध्या 1 लाख 38 हजार सबस्क्राइबर आहेत. या चॅनेलवर राजकीय घडामोडींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती, मनोरंजन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील व्हिडीओ अपडेट पाहायला मिळतात.