
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या हिंदुस्थानविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. हिंदुस्थानविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करणारा युवा फलंदाज नॅथन मॅकस्विनीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी 19 वर्षीय सॅम कोन्स्टासला संघात स्थान देण्यात आले आहे, तर दुखापतग्रस्त असलेल्या जॉश हेझलवूडच्या जागी झाय रिचर्डसनला संधी देण्यात आली आहे.
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धा रंगतदार स्थितीत आली आहे. 1-1 अशा बरोबरीत असणाऱया मालिकेत तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिल्याने अधिक रंगत निर्माण झाली आहे. आता मालिकेचे उर्वरित दोन सामने हे मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवले जाणार आहेत.
मेलबर्न येथे 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आले आहेत. हिंदुस्थानविरुद्ध संधी देण्यात आलेल्या मॅकस्विनी याला पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 10, 0, 39, 10, 9 आणि 4 अशी धावसंख्या त्याला पहिल्या सहा डावांमध्ये करता आली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात मॅकस्विनीला बाकावर बसवण्यात येणार असून त्याच्या जागी कोन्स्टास पदार्पण करेल. मागच्या महिन्यात हिंदुस्थान ‘अ’ विरुद्ध झालेल्या सामन्यात कोन्स्टासने नाबाद 73 धावांची खेळी केली होती. सॅम कोन्स्टास हा गुलाबी चेंडूच्या कसोटी आधी कॅनबेराच्या मैदानात रंगलेल्या टीम इंडियाविरुद्ध सराव सामन्यात पंतप्रधान इलेव्हन संघाचा भाग होता. या सामन्यात त्याने 107 धावांची दमदार खेळी केली होती. मागील 70 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या संघात पदार्पण करणारा सॅम कोन्स्टास हा सर्वात युवा खेळाडू ठरणार आहे.