नॅशनल पार्कमध्ये ‘वनराणी’ अवतरली, सहा वर्षांनंतर टॉय ट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणींशी घट्ट नाते असलेली बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ मिनी ट्रेन पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे. निसर्गरम्य वातावरण, हिरवाईने नटलेला परिसर आणि वन्यजीवांनी समृद्ध जैवविविधता अनुभवण्याची अनोखी संधी या मिनी ट्रेनच्या माध्यमातून पर्यटकांना मिळणार आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे मे 2021 पासून वनराणीची सेवा विस्कळीत झाली होती. तब्बल सहा वर्षांनंतर अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासह ही मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत रुजू झाले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत शनिवारी या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘व्हिस्टाडोम’ मिनी ट्रेन आणि वनराणी विंटेज ट्रेन अशा दोन ट्रेन या धावणार असून, त्या बॅटरीवर चालणाऱया असल्यामुळे पर्यावरणपूरक आहेत. पर्यावरण संवर्धन, निसर्ग पर्यटनाला चालना आणि उद्यानातील समृद्ध वनसंपदेची ओळख करून देण्याच्या दृष्टीने ‘वनराणी’ मिनी ट्रेन पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण ठरणार आहे.