खाऊगल्ली- मुंबईकरांची खाऊगल्ली

>> संजीव साबडे

रोज हजारो मुंबईकरांचं उदरभरण करणाऱया खाऊगल्ल्या जिव्हाळ्याच्या आणि जिव्हेच्या लाडक्या. कधी मित्र-मैत्रिणीसमवेत गप्पा मारत आणि अचानक तिथून जाताना वेगवेगळे चांगले वास नाकात शिरतात. मग आसपास लक्ष जातं. अशा या खाऊगल्लींच्या दोन्ही बाजूला वडापाव, कांदा-बटाटा भजी, कुठे भाजीपाव, डोसा, मोमो, भेळपुरी, पाणीपुरी, सँडविच, पिझ्झा, ज्यूस, पुलाव, चायनीज पदार्थ बनवणं आणि खाणं सुरू असतं. ज्यांना रोज रेस्टॉरंट परवडत नाही, ज्यांना रेस्टॉरंटमध्ये खात बसायला वेळ नसतो, ज्यांचं पाकीट फार भरलेलं नसतं, अशा नोकरदार मुंबईकरांचा ही खाऊगल्ली म्हणजे आसराच.

आपल्यापैकी अनेकजण कित्येकदा फोर्टमध्ये जात असतील. चर्चगेटला उतरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे बोरीबंदरला जात असतील. कदाचित बोरीबंदरहून चर्चगेटच्या दिशेला जात असतील. काही वेळा फॅशन स्ट्रीटवर खरेदी करत असतील. कधी एसएनडीटी, निर्मला निकेतन, पाटकर हॉल, बॉम्बे हॉस्पिटल, बिर्ला मातोश्री सभागृह यापैकी कुठे जात असाल. येता-जाता सतत क्रॉस मैदान लागतं किंवा दिसत राहतं. पूर्वी या मैदानावर सर्कस येई. आंदोलनं व निदर्शनं होत. आता तिथे क्रिकेट, फुटबॉल खेळला जातो. त्या मैदानाच्या दक्षिणेला भिका बेहराम ऊर्फ पारशी विहीर आहे. उत्तरेच्या टोकाला ख्रिश्चनांचा क्रॉस आहे. त्यामुळेच ते झालं क्रॉस मैदान. मरीन लाइन्स व चर्चगेट यांना आतून जोडणाऱया न्यू मरिन लाइन्सला लागून आहे हे मैदान आणि त्या मैदानाच्या मधून लोकांना एकीकडून दुसरीकडे जायला रस्ता आहे. रोज लाखभर लोक तरी तिथून ये-जा करत असतील. आसपास व फॅशन स्ट्रीटवर फिरणारे तर वेगळेच.

त्या रस्त्यावरून आपण घाईघाईने जात असतो. कधी मित्र-मैत्रिणीसमवेत गप्पा मारत आणि अचानक तिथून वेगवेगळे छान छान वास नाकात शिरतात. मग आसपास लक्ष जातं. दोन्ही बाजूला वडापाव, कांदा-बटाटा भजी, भाजीपाव, डोसा, मोमो, भेळपुरी, पाणीपुरी, सँडविच, पिझ्झा, ज्यूस, पुलाव, चायनीज पदार्थ बनवणं आणि खाणं स्रू असतं. सकाळी 9 वाजता पेटलेला गॅस वा स्टोव्ह रात्री 9-10 वाजेपर्यंत तसाच स्रू असतो. त्यावर कढया, वेगवेगळ्या प्रकारचे तवे, कुकर, इडली व मोमो पात्रं, टोस्ट मेकर बसलेले असतात. कुठेतरी मिक्सरमध्ये चटणी वाटली जाते, ज्यूसरमधून निघणाऱया वेगवेगळ्या ज्यूसचे ग्लास भरले जात असतात. नेमका आकडा सांगता येणार नाही, पण रोज हजारो मुंबईकरांचं उदरभरण या दोन्ही बाजूच्या स्टॉल्समध्ये तयार होणाऱया खाद्य पदार्थांवर होत असतं. ज्यांना रोज रेस्टॉरंट परवडत नाही, ज्यांना रेस्टॉरंटमध्ये खात बसायला वेळ नसतो, ज्यांचं पाकीट फार भरलेलं नसतं, अशा नोकरदार मुंबईकरांचा ही खाऊगल्ली म्हणजे आसराच. त्या भागात जाऊनही तुम्ही या गल्लीतील लेनिनचा भजीपाव खाल्ला नाहीत तर तुम्ही आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेला मुकाल, असं लोक म्हणतात. आज मुंबईतील जे दोन-तीन भजीपाव लोकप्रिय व प्रसिद्ध आहेत, त्यात आता लेनिनचा हमखास उल्लेख केला जातो. अगदी साध्या भाजीपावपासून खडा भाजीपाव, जैन भाजीपाव, चीज भाजीपाव असे किमान 10/15 प्रकार तिथे आहेत. याशिवाय तिथला पुलावही अत्यंत चविष्ट व खमंग. त्यातही साधा, जैन, अमूल, चीज असे प्रकार आहेतच. जवळच लिशा भाजीपाव स्टॉलही लोकप्रिय आहे. त्यांच्याकडे हे सारे भाजीपाव व पुलाव प्रकार आहेतच. त्याचबरोबर फ्राईड राईस, अनेक प्रकारचे नूडल्स, व्हेज चिली, अमेरिकन
चॉप्सुयी आणि विविध सूप यावरही अनेक मुंबईकर ताव मारताना दिसतात.

पण केवळ भाजीपाव वा पुलाव कसा चालेल? अशा ठिकाणी डोसा व अन्य दाक्षिणात्य पदार्थ हवेतच. कमीत कमी तेलातल्या व कमी मसाल्याच्या पदार्थांकडे अनेक जण वळू लागले आहेत. त्यामुळे तिथेही साधा, रवा, म्हैसूर असे अनेक प्रकारचा डोसा आणि सोबतच उत्तप्पा, मेदुवडा आणि गरमागरम वाफाळलेली इडली एका छोटय़ाशा स्टॉलवर मिळते. रेस्टॉरंटच्या साधारण निम्म्या वा त्याहून कमी दरात इथे उत्तम दर्जा व आकाराचे दक्षिणी खाद्यपदार्थ सकाळी 10 वाजल्यापासून मिळतात. शिवाय मुंबईभर मिळणारा इंडियन बर्गर म्हणजे मराठमोळा वडापावही इथे आहे. मात्र तिथून जवळ हुतात्मा चौकासमोर व सीटीओच्या फूटपाथवर मिळणारा वडापाव खूप म्हणजे खूपच छान. पूर्ण कुस्करलेल्या बटाटय़ात कोथिंबीर, आलं, लसूण व मीठ या सर्वांचं वाटण असलेला हा वडा अप्रतिम.

पुन्हा एसएनडीटी खाऊगल्लीकडे वळू. खाऊगल्ली म्हटलं की भेळ, शेवपुरी, शेव बटाटापुरी, पाणीपुरी हे चाटचे प्रकार मिळायलाच हवेत. त्यासाठी तिथे ललित भेळ सेंटर आहे. भेळ, पाणीपुरी, शेवपुरी या सर्वांसाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चटण्या. त्यांची चव चटण्यांवर अवलंबून असते आणि ललित भेळच्या चटण्या अतिशय उत्तम. शिवाय तिथे स्वच्छता दिसते आणि असते. पोटातील भुकेनुसार सकाळपासून तिथे लोक त्या स्टॉलपाशी दिसत राहतात. भाजीपाव, पुलाव, फ्राईड राईस, नूडल्स हे प्रकार दुपारी जेवणाच्या वेळी खायचे. भेळ, वडापाव भूक नसली तरी खावेसे वाटतात वा खाल्ले जातात. सँडविच हा दुपारनंतर खायचा पदार्थ, पण हल्ली सँडविच, टोस्ट, पिझ्झा, फ्रँकी हे प्रकार मुंबईकर फार भूक नसली तरी खातात. या खाऊगल्लीतील सँडविच स्टॉलही अतिशय प्रसिद्ध आहे. गल्लीच्या तोंडावर असलेल्या स्टॉलमध्ये साधा, टोस्ट, मसाला, ग्रिल, चीज ग्रिल असे अनेक सँडविच प्रकार आहेत. त्यातील चीज ग्रिल सँडविच लोकांचा आवडता. बरेच जण तो खाताना दिसतात. या हंस रस मंदिरात फ्रँकीचेही अनेक प्रकार आहेत आणि इथला रोझ फालुदा अवश्य घ्यावा.

सँडविच व पिझ्झा हे प्रकार आता जसे लोकप्रिय झाले आहेत, तसंच काहीसं मोमोचं झालंय. कुठेही गेलात तरी अगदी छोटय़ाशा जागेत एखादा पोरगा मोमो बनवून विकत असतो. सोबत शेझवान व मेयोनीज सॉस. काही मोमो नुसते उकडलेले, तर काही आवडीप्रमाणे उकडून तळलेले. तिथे अनेक जण गर्दी करून असतात. या गल्लीत अगदी गरम मोमो, शॉरमा, फ्रँकी, पिझ्झा, चिकन लॉलीपॉप हे प्रकार मिळतात.
शॉरमा व मोमो हे पदार्थही संध्याकाळी खायचे. भूक लागली असेल तर फ्रँकी दुपारी खाल्ली जाते. चायनीज खाद्य पदार्थांच्या शौकीन मंडळींना इथे आसरा आहे राजू चायनीज स्टॉलचा. तिथे संध्याकाळनंतर बरीच गर्दी असते.

सँडविच व फ्रँकीसाठी ज्या ठिकाणाचा उल्लेख केला ते हंस रस मंदिर हे नावाप्रमाणेच ज्यूस, कोल्ड्रिंक्स, कुल्फी, आइक्रीम व फालुदा यासाठी अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय! त्या स्टॉलपाशी त्यामुळेच सतत गर्दी असते. हवं ते खाऊन झाल्यावर चहा वा थंड काही हवं असतं. मात्र इथे चहा-कॉफीपेक्षा ज्यूसला लोक पसंती देताना दिसतात.

[email protected]