शहापूरचा झेंडा आयपीएलमध्ये फडकला, ओंकार तारमळेची सनरायझर्स हैदराबाद संघात निवड

दुर्गम व असुविधांच्या विळख्यात असलेल्या शहापुरातील ओंकार तारमळे तरुणाने आयपीएलमध्ये झेंडा फडकावला आहे. ओंकारने उत्कृष्ट वेगवान गोलंदाजी करत क्रिकेटच्या राष्ट्रीय व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहे. त्याची आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघात निवड झाली असून ओंकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ओंकार तारमळे हा शहापूरच्या शेरे गावातील रहिवासी आहे. आई गृहिणी व वडील ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा गाडा चालवतात. शेतीवर मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. लहानपणापासूनच हलाखीचे दिवस असल्याने ओंकारचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण वासिंदच्या सरस्वती विद्यालयात घेतले. क्रिकेट आणि कबड्डीची आवड असलेल्या ओंकारने परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले. कोणत्याही अकादमीकडे न जाता त्याने गेरसे गावातील मोकळ्या मैदानात मित्रांसोबत अथक परिश्रम घेतले. त्यानंतर स्थानिक जिल्हा स्पर्धांसह विभागीय स्तरावर गोलंदाजी करत थेट आयपीएल गाठले. आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघात वेगवान गोलंदाजपदी निवड झाली आहे.

मुंबई, दिल्लीतही उत्कृष्ट कामगिरी

रेल्वे संघाकडून खेळणारे नरेंद्र दिवाने यांच्याकडून ओंकारला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी दिलेले क्रिकेटचे धडे गिरवत ओंकारने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी बजावली. त्याने मुंबई, दिल्ली, हैदराबाद येथील सामन्यात गोलंदाजीची उत्कृष्ट झलक दाखवली. गावातील माती ते थेट आयपीएलपर्यंतच्या संघर्षमय प्रवासासाठी सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे