ताडवाडी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावा; माहुलमध्ये हलवलेल्या बीआयटी चाळकऱ्यांना माझगावमध्येच घरे द्या

माझगाव ताडवाडीतील पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांच्या दालनात तातडीने पालिका आयुक्त, अधिकारी, विकासक आणि रहिवाशांचे प्रमुख प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी आणि प्रकल्प राबवण्यात यावा, तसेच सध्या माहूलच्या प्रदूषित ठिकाणी हलवलेल्या बीआयटी चाळींतील रहिवाशांना पुन्हा माझगावमध्येच घरे द्यावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत केली.

भायखळा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत माझगाव ताडवाडी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा उचलून धरला. राज्य शासनाच्या नगरविकास खात्यांतर्गत येणारा मुंबई महापालिकेच्या माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बीआयटी चाळ क्रमांक 14, 15 आणि 16 या इमारतींतील रहिवाशांना अनेक वर्षांपासून माहुलसारख्या प्रदूषित ठिकाणी नेऊन ठेवले आहे. त्यांचे पुन्हा माझगावमध्येच स्थलांतर करण्यात यावे, अशी आग्रही मागणी जामसुतकर यांनी केली.

रहिवाशांना विश्वासात न घेताच विकासक नेमला!

सध्या पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांना विश्वासात न घेता विकासक नेमला आहे. हा विकासक फक्त लायझनींगचे काम करणारा असून प्रत्यक्षात त्याने कुठेही इमारत बांधलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनात पालिका आयुक्त, अधिकारी, विकासक व रहिवाशांचे प्रमुख प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी आणि रहिवाशांना विश्वासात घेऊनच पुनर्विकास प्रकल्प राबवावा, अशीही मागणी जामसुतकर यांनी केली.