
भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर अमराठी, परप्रांतीयांची मराठी माणसांवर मुजोरी तर वाढली आहेच, पण त्याचबरोबर मराठी माणसांवरील हल्लेही वाढले आहेत. मात्र सरकार कोणाचेही असो, मराठी माणसांवरील मुजोरी आणि हल्ले या पुढे खपवून घेतले जाणार नाही. अशा हल्ल्यांना योग्य ते उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेच्या शिव विधी व न्याय सेनेने दिला आहे.
मुंबईसह राज्यभरात परप्रांतीयांच्या वाढत्या मुजोरी आणि मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना उपनेते व संलग्न संघटनांचे समन्वयक डॉ. भाऊ कोरगावकर व शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे आणि शिव विधी व न्याय सेनेच्या वकील पदाधिकाऱ्यांबरोबर आज शिवसेना भवनमध्ये बैठक झाली. मराठी माणसांच्या पाठीशी शिवसेना व शिव विधी व न्याय सेना खंबीरपणे उभी असून मराठी माणसांवर होणाऱया हल्ल्यांना योग्य ते उत्तर देऊ असा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला अॅड. सुमित घाग, अॅड. सतीश सकट, अॅड. काजल कदम, अॅड. दर्शना जोगदनकर, अॅड. शीतल मोहिले, अॅड. सुषमा थोरात, अॅड. निरंजन पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
- गिरगावमध्ये मारवाडी वाण्याने आता मारवाडी भाषेत बोला, मराठीत बोलू नका, असा दम देत मुजोरी केली. मराठी महिलेने प्रकरण लावून धरत उजेडात आणल्यानंतर वाण्याने माफी मागितली.
- विलेपार्ले येथे एका मराठी तरुणाला मुजोर रिक्षावाल्यांनी अडवून भररस्त्यात मारहाण केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
- कल्याणमध्ये घराबाहेर धूप पेटवण्यावरून झालेल्या वादात शेजारच्या घरात राहणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने बाहेरून गुंड बोलावून दोन मराठी कुटुंबांना मारहाण केली. या प्रकरणी मुख्य आरोपीसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.