शिवसेना, मनसेचा मुकेश शहाणे यांना पाठिंबा; भाजप, बडगुजर यांना मोठा दणका

एबी फॉर्म पळवून उमेदवारी मिळवणाऱया दीपक सुधाकर बडगुजर यांना पाठीशी घालत भाजपाने माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यावर अन्याय केला आणि हकालपट्टीही केली. अपक्ष उमेदवारी करणाऱया शहाणे यांना आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला. यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. हा भाजप उमेदवार बडगुजर यांना मोठा दणका आहे.

भाजपाच्या एबी फॉर्म पळवापळवीमुळे प्रभाग 29 चांगलाच चर्चेत आला. पक्षाने माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, एबी फॉर्म पळवून दीपक बडगुजर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे शहाणेंच्या आधी अर्ज दाखल केला. परिणामी, शहाणे यांचा अर्ज बाद झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात येऊन सुधाकर बडगुजर यांनी मुलासाठी आपला राजकीय बळी घेतल्याचा आरोप करीत शहाणे अपक्ष उमेदवारीवर ठाम राहिले. बडगुजर पिता-पुत्राच्या हट्टापायी पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय केला, दोन दिवसांपूर्वी हकालपट्टीही केल्याने जनतेत भाजपविरोधी लाट आहे.

शिवसेनेने प्रभाग 29(अ) मध्ये शहाणे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला, ‘क’ आणि ‘ड’मध्ये शिवसेनेचे, तर ‘ब’मध्ये मनसेचा उमेदवार निवडणूक लढवत आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी दिली. मनसे प्रदेश उपाध्यक्ष रतनपुमार इचम यांनीही पाठिंब्याचे पत्र दिले. राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने मुकेश शहाणे यांच्यासोबतच शिवसेनेच्या मोनिका अंपुश वराडे यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती पश्चिम विधानसभा अध्यक्ष विजय मटाले यांनी दिली.

त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाईन

भाजपाने अतिशय खालची पातळी गाठून माझा छळ केला. प्रामाणिक कार्यकर्त्याला झालेला हा त्रास पाहून शिवसेना व मनसे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो, मी नक्कीच विजयी होईन आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाईन, अशी प्रतिक्रिया मुकेश शहाणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.