
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आयपीएल 2026 मधील पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 6 एप्रिल रोजी होणारा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यावर श्रेष्ठाने पंजाबची जर्सी घालून एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. “आम्ही पंजाबी मोठ्या मनाचे आहोत, म्हणून तुम्हाला एक गुण दिला,” असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले होते. या व्हिडीओवरून KKR च्या चाहत्यांनी श्रेष्ठाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

दरम्यान आता श्रेष्ठाने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी आणि आपल्या भावाला पाठिंबा देण्यासाठी होता. यात कोणत्याही संघाचा अपमान करण्याचा तिचा हेतू नसल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. “हा फक्त एक खेळ आहे आणि प्रत्येकाने तो खिलाडूवृत्तीने घ्यायला हवा. मी कोणालाही ट्रोल करत नव्हते, तर तो माझा आनंद साजरा करण्याचा एक मार्ग होता,” असे तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे स्पष्ट केले. श्रेष्ठाच्या या व्हिडीओमुळे तिला फक्त ट्रोलिंगलाच नाही तर धमक्यांनाही सामोरे जावे लागले.
नेटकऱ्यांकडून येणाऱ्या धमक्या आणि ट्रोलिंगमुळे अखेर श्रेष्ठाने तो व्हिडिओ डिलीट करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ काढला याचा अर्थ मी काही चुकीचे केले असा नाही. मला माझ्या भावाचा आणि त्याच्या संघाचा आदर आहे. सोशल मीडियावर केवळ द्वेष आणि नकारात्मकता पसरू नये, यासाठी मी हे पाऊल उचलले. साध्या विनोदाचे इतक्या गंभीर वादात रूपांतर होईल, अशी अपेक्षा मला नव्हती, असेही तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे. शेवटी श्रेष्ठाने नेटिझन्सना एकमेकांशी प्रेमाने आणि समजूतदारपणाने वागण्याचे आवाहन केले. “खेळातील चढाओढ मैदानावर असणे ठिक आहे, पण त्यासाठी वैयक्तिक आरोप करणे चुकीचे आहे,” असे ती म्हणाली.




























































