
सोशल मीडियावर कोणतीही गोष्टी व्हायरल झाली की ती लोक अगदी सहजपणे त्यावर विश्वास ठेवतात. विशेषत: कलाकारांबाबत अशा गोष्टी झपाट्याने पसरतात. सध्या अभिनेता श्रेयस तळपदेबद्दलची खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना धक्काच बसला. मात्र श्रेयसने या अफवांवर आता सडेतोड उत्तर दिले आहे.
श्रेयसने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. ज्या पोस्टमध्ये माझ्या मृत्यूचा दावा केला जात होता त्या पोस्टची मला माहिती मिळाली. मी समजू शकतो की लोक हे फक्त प्रसिद्धीसाठी करत असतात. मात्र अशा खोट्या बातम्यांमुळे अनेकांना त्याचा त्रास होतो. माझ्या मृत्यूच्या बातमीमुळे माझ्या चाहत्यांना आणि माझ्या नातेवाईकांना याचा त्रास झाला असेल. माझ्या बातम्या पसरवणे म्हणजे एखाद्याच्या कुटुंबीयांच्या भावनांशी खेळ केल्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. असे श्रेयसने पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
मला एक लहान मुलगी आहे. आता ती शाळेत जाते. ती मला रोज माझ्या तब्येतीबाबत विचारणा करते. मात्र अशा खोट्या बातम्यांमुळे ती सतत मला प्रश्न विचारत असते, मी बरा आहे का? हे सतत तिला जाणून घ्यायचं असत. त्यामुळे जे कोणी अशा बातम्या पसरवत आहेत त्यांनी ते लगेच थांबवावे. या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल यांचा विचार करावा. काही लोक माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशा अफवांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आता हे सगळ थांबवा. मी जिवंत आहे आणि ठीक आहे. माझ्या मृत्यूची खोटी पोस्ट मी इथे शेअर केली असती पण, यामुळे तो व्यक्ती प्रसिद्ध झाला असता. त्यामुळे मला ते करायचं नाही, असंही श्रेयस म्हणाला आहे.
दरम्यान, वेलकम टू द जंगलच्या शूटिंगदरम्यान श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता अभिनेता पूर्णपणे बरा आहे.