सगळ्यांनी घरीच रहा, जर…; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने खासदाराला दिली धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचे परदेशात बसून हिंदुस्थानी नेत्यांना धमकावण्याचे काम सुरू आहे. पन्नूच्या ‘सिख फॉर जस्टिस’ या दहशतवादी संघटनेने केरळमधील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) चे राज्यसभा खासदार व्ही शिवदासन यांना धमकी दिली आहे. पन्नूने लाल किल्ला आणि संसद उडवणार असल्याची धमकी त्यांना दिलीय. यासंदर्भात खासदार व्ही शिवदासन यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे.

सीपीआयचे खासदार व्ही शिवदासन यांनी सिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेने दिलेल्या धमकीबाबत राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहीले आहे. यामध्ये त्यांनी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूकडून आलेल्या धमकीचा उल्लेख केला आहे. “मी तुमचे लक्षात आणून देऊ ईच्छितो की सिख फॉर जस्टिस या संघटनेकडून आम्हाला धमकीचा कॉल करण्यात आला आहे. 11 जुलै रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा कॉल आला. त्या व्यक्तीने मी सिख फॉर जस्टिस या संघटनेचा असल्याचे सांगितले.

‘संसदेच्या सदस्यांनो, आम्ही हा संदेश गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या आदेशावर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही संसदेपासून लाल किल्ल्यापर्यंतचा परिसर बाँबने उडवणार आहोत. हिंदुस्थानी राज्यकर्त्यांचे डोळे आणि कान उघडण्यासाठी हे करत आहोत. कारण शीखांचे अस्तित्व धोक्यात आहे. जर तुम्हाला हा थरार अनुभवायचा नसेल तर घराबाहेर पडू नका. ‘असे त्यांनी कॉलवर म्हंटले आहे.

दरम्यान या धमकीबाबत व्ही शिवदासन यांनी नवी दिल्ली जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माझी आपणास विनंती आहे की कृपया या प्रकरणाची दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी. असे त्यांनी या पत्रात म्हंटले आहे.