
गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा खराब फॉर्म डोकेदुखी ठरत आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही विराट आणि रोहितची शेवटची मालिका असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. संघातील इतर युवा आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी यासाठी रोहित, विराट निवृत्तीची घोषणा करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेचा थरार रंगला आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर हिंदुस्थानने मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला दुसऱया सामन्यात धक्का देत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱया कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करूनदेखील सततच्या पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाचा मालिकेत आघाडी घेण्याची संधी हुकली. तिसरी कसोटी अनिर्णीत राहिल्याने मालिका अधिक रंगतदार झाली असून सर्वांचे लक्ष आता चौथ्या कसोटी सामन्याकडे लागले आहे.
एकीकडे कसोटी मालिका रंगतदार झालेली असतानाच तिसऱया कसोटी सामन्यानंतर अचानक निवृत्ती जाहीर करत रविचंद्रन अश्विनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अश्विनने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनच्या निवृत्तीनंतर अनेक क्रिकेटतज्ञांनी विराट कोहली आणि रोहित शर्मादेखील अश्विनच्या पावलावर पाऊल टाकतील असा अंदाज व्यक्त केला आहे. रोहित शर्मा गेल्या 11 डावांमध्ये मोठी खेळी साकारू शकलेला नाही. त्याचा खराब फॉर्म हा संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या 11 डावांत रोहितची सरासरी ही केवळ 11.69 इतकीच आहे, तर दुसरीकडे पहिल्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावल्यानंतर विराटने त्याचे पुनरागमन झाल्याची झलक दाखवली होती, मात्र ती काही काळासाठीच असल्याचे स्पष्ट झाले. विराट गेल्या काही डावांमध्ये सतत एकाच चेंडूवर बाद होत असल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे. त्यामुळे विराट आणि रोहित सिडनी येथे होणारी कसोटी ही शेवटची कसोटी म्हणून खेळू शकतात. युवा आणि प्रतिभावान क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी रोहित, विराट निवृत्तीची घोषणा करू शकतात, असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर फिरकीपटू रवींद्र जाडेजाही क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.