माझ्या चाहत्यांना निर्णय पचवणे कठीण जाणार; अश्विनला निवृत्तीबाबत ना खेद ना खंत

निवृत्तीच्या निर्णयाबाबत मी गेल्या काही दिवसांपासून विचार करत होतो त्यामुळे हा माझ्यासाठी फार मोठा निर्णय नव्हता. मात्र माझ्या चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण असून माझा निर्णय पचविण्यासाठी त्यांना काही वेळ लागू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करण्याच्या निर्णयाबाबत माझ्या मनात कुठलाही खेद नाही किंवा खंत वाटत नाही, असे मत हिंदुस्थानचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले.

गॅबा कसोटी सामन्यानंतर अश्विनने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अश्विनचे मायदेशात आगमन झाले. त्यावेळी चाहत्यांनी अश्विनचे जंगी स्वागत केले. घरी दाखल होताच त्याने आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

अश्विन म्हणाला, निवृत्तीच्या निर्णयाबाबत माझ्या मनात कुठलाही खेद किंवा खंत नाही. मागच्या दोन वर्षांपासून मी निवृत्तीविषयी विचार करू लागलो होतो. भविष्याबाबत कोणतेही लक्ष्य निर्धारित केलेले नाही.

अपमानामुळे अश्विनचा निवृत्तीचा निर्णय

संघामध्ये स्थान न मिळाल्याने अश्विनला तो अपमान वाटला असावा. त्यामुळेच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असावा, असा आरोपी अश्विनच्या वडिलांनी एका मुलाखतीत केला आहे. अश्विनचा निर्णय कुटुंबासाठी भावनिक आहे, असेही ते म्हणाले होते.

अश्विन आमच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा

ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क याने अश्विनच्या निवृत्तीबाबत त्याला शुभेच्छा देताना, अश्विन हा आमच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा ठरत होता, असे सांगितले. हिंदुस्थान विरुद्ध कसोटी खेळताना अश्विनने नेहमीच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जाळय़ात ओढले आहे. त्याची कारकीर्द खास राहिली आहे, मला खात्री आहे त्याने त्याच पद्धतीने कारकिर्दीचा आंनद घेतला असेल, असेही स्टार्क म्हणाला.

मला ऍटॅक आला असता…

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर फोनवर आलेली कॉल हिस्ट्री पाहून अश्विनला धक्का बसला. निवृत्तीच्या निर्णयानंतर अश्विनला अनेक बडय़ा खेळाडूंचे फोन येऊन गेले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह कपिलदेव यांचा फोन अश्विनला येऊन गेला. याबाबत अश्विनने सोशल मीडियावर कॉल हिस्ट्री शेअर करत ‘मला 25 वर्षांपूर्वी सांगितले असते की माझ्याकडे एक स्मार्टफोन आहे, ज्याचा कॉल लॉग माझ्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी अशा दिग्गजांचे फोन येणार आहेत, तर तेव्हा मला हार्ट ऍटॅकच आला असता,’ अशा शब्दांत त्याने त्याच्या भावना व्यक्त केला आहेत. मला फोन करून शुभेच्छा दिल्याबद्दल सचिन आणि कपिल पाजी यांचे आभार, असेही अश्विनने सोशल मीडियावरील संदेशात नमूद केले आहे.