मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा? अजित पवारांच्या पक्षाचं पुढे काय होणार? सुनील तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांच्या अकाली जाण्याचा धक्का आणि त्या धक्क्यातून आम्ही कोणीच सावरलेलो नाही आहोत. अजूनही आम्हाला वाटतंय दादा आमच्यातच आहेत. या शोकमग्न अवस्थेतच आम्ही आहोत. आज त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयामध्ये हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. पण ज्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नमस्तक व्हावं, याच विनम्र भावनेने मी आलो होतो, असे सुनिल तटकरे म्हणाले.

आज मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. सुनेत्रा वहिनी आणि परिवार हे धार्मिक विधीमध्ये आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व परिवाराशी चर्चा करू. आणि त्या संदर्भातील जी काही चर्चा आहे त्यावर ठरवू. जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींसोबत बोलणं, परिवारासोबत बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनशील आहे, असे तटकरे म्हणाले.

अजित दादांनी ज्या पद्धतीने सबंध महाराष्ट्र घडवला, त्यांच्या निधनाने सबंध राज्य शोकमग्न आहे. यामुळे त्याच अतिशय शोकाकूल, दुःखद वातावरणात आम्ही आहोत. बाकी कुठल्याही विषयावर चर्चा नाही. मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. कालही मुख्यमंत्री अंत्यसंस्काराला आले होते, असे सुनिल तटकरे म्हणाले.