
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बहिणी लाडक्या झाल्या आहेत. 1500 रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत. आणि या नात्यावरूनही महायुतीत श्रेयवाद होत असल्याचा जोरदार टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सांगली जिल्ह्यातील तासगांवमध्ये एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. बहिणीला काही नाही दिलं, तरी बहीण तुमच्यावर प्रेम असंच करतात आणि दुर्दैव हे की या सरकारमध्ये लाडक्या बहिणीवरूनही श्रेयवाद सुरू आहे. जगातलं संस्कारांचं सगळ्यात पवित्र नातं हे बहीण भावाचं असतं, त्या पवित्र नात्यामध्ये राजकारण सुरू आहे, अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
एक वर्षांपूर्वी पक्ष गेला आणि चिन्ह सुद्धा गेलं. आम्हाला नवीन चिन्ह मिळेल की नाही? याचीही खात्री नव्हती. मात्र, पांडुरंगाने तुतारी चिन्ह आम्हाला दिलं. तुतारी चिन्ह आज वाड्या-वस्त्यांवर पोहोचले आहे. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेनं निवडणूक हाती घेतली होती. त्यामुळे माझं श्रेय त्यांना आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. काही लोक आम्हाला विचारणा करत आहेत की चांगलं चिन्ह मिळालं आहे तर, न्यायालयीन लढा कशासाठी देत आहात? मात्र ही लढाई तत्त्वांसाठी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.