ताडोबात वाघाचे जवळून शूटिंग, वन विभागाने दिला कारवाईचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा परिसरात रस्ता ओलांडणाऱया वाघाचा अतिशय जवळून व्हिडीओ काढण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जंगलातील वन्यजिवांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियम असतानाही काही लोकांनी नियम धाब्यावर बसवत वाघाच्या अगदी जवळ जाऊन व्हिडीओ चित्रीकरण केले. या घटनेची गंभीर दखल घेत वन विभागाने संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील पद्मापूर-मोहर्ली मार्गावर ही घटना घडल्याचे समजते. जंगलातून बाहेर येत एक वाघ रस्ता ओलांडत होता. त्या वेळी रस्त्यावरून जाणाऱया काही वाहनचालकांनी आपली वाहने थांबवली आणि वाघाचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. काहींनी मोबाईल कॅमेऱयाने अगदी जवळून व्हिडीओ काढल्याचेही दिसत आहे. वन विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवली जात आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे संबंधित अधिकाऱयांनी सांगितले.