अ.भा. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात; 19 ते 22 डिसेंबर भरगच्च कार्यक्रम, साहित्य संमेलनही होणार

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन 19 ते 22 डिसेंबर दरम्यान पुणे येथे होणार आहे. दैवज्ञ समाजोत्रती परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस हा सोहळा होणार असून श्री अष्टभुजा दुगदिवी इस्टेट ट्रस्ट संस्थेने त्याची जय्यत तयारी केली आहे. देशभरातील असंख्य दैवज्ञ बांधव या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. याच वेळी दहावे दैवज्ञ साहित्य संमेलनही पुण्यनगरीत रंगणार आहे.

दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे 21वे राष्ट्रीय अधिवेशन व दहाव्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचा भव्य सोहळा गुरुवारी 19 ते रविवारी 22 डिसेंबरपर्यंत पुण्यातील शुक्रवार पेठ येथील गणेश कला-क्रीडा मैदानावर होणार आहे. गुरुवारी 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य शोभायात्रा निघणार असून शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता उ‌द्घाटनाचा सोहळा होणार आहे. पद्माकरराव पांडुरंगर्पत रत्नपारखी व स्व. सुमती रत्नपारखी नगरीत सकाळी 10 वाजता केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गजानन रत्नपारखी व अजय कारेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उ‌द्घाटन होणार आहे. या वेळी दैसपचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्यासह डॉ. गजानन रत्नपारखी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करणार आहेत.