कोपरगावात मोरासह तीन लांडोरचा मृत्यू

सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून, बियाणांवर लष्करी अळीचा हल्ला होत आहे. यामुळे शेतकरी बियाणांना कीटकनाशके लावून लागवड करत आहेत. पेरलेले बियाणे खाल्ल्याने तालुक्यातील पढेगाव येथे तीन लांडोर व एका मोराचा मृत्यू झाला,

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-वैजापूर रस्त्यावरील पढेगाव येथील शेतकरी सतीश नेने नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले असता, त्यांना गट नंबर 155 मध्ये एक मोर व लांडोर मृतावस्थेत दिसले. त्यांच्याच बाजूला दोन मोर विव्हळत पडल्याचे दिसून आले. त्यांनी ते जखमी मोर घरी आणले व त्यांच्यावर औषधोपचार केले. याबाबत त्यांनी तत्काळ वन विभाग अधिकाऱयांना माहिती दिली. काही वेळाने वनरक्षक अमोल किनकर व साथीदार तेथे आले. त्यांनी जखमी मोरांवर प्राथमिक उपचार केले. वन अधिकारी प्रतिभा सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कीनकर यांना मयत मोर, लांडोर व जखमी मोर गाडीवर घेऊन येण्यास सांगितले. पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे यांच्याशी संपर्क केला असता, दवाखान्यात गर्दी असून, मी पढेगाव येथे येऊ शकणार नाही, असे सांगितले. त्यानंतर नेने यांनी टेम्पो बोलावून त्यात मयत मोर, लांडोर आणि जखमी मोरांना दहे यांच्याकडे पाठविले. तपासणी केल्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे म्हणाले, सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतात शेतकरी बियाणे पेरतो, त्यावेळी त्याला विषारी औषध लावलेले असते. हे बियाणे पक्षी खातात. लांडोर व मोराचा मृत्यू शेतातील बियाणे खाण्यात आल्याने होऊ शकतो. मोराचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे अहवाल आल्यावर समजेल, असे डॉक्टरांनी सांगितले. तीन लांडोर व एका मोरावर कुंभारी येथील काटवणात अग्निदहन करण्यात आले. याप्रसंगी वनरक्षक श्रद्धा पडवळ, अमोल किनकर, समीर शेख, सागर इंदरखे, प्रदीप इंदरखे उपस्थित होते.