
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळणारी मुस्लिम मते पह्डण्यासाठी एक हजार कोटींची डील झाल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसने आज केला. आरोपाचा पुरावा म्हणून तृणमूलच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ दाखवला. बंगालमध्ये ‘प्रतिबाबरी’ उभारण्याची घोषणा करणारे हुमायू कबीर यांचा हा व्हिडीओ असून त्यात ते एक हजार कोटी मिळणार असल्याचे सांगत आहेत. भाजपचे एक मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचाही यात संबंध असल्याचा दावाही तृणमूलने व्हिडीओच्या आधारे केला.
हुमायू कबीर यांनी काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून आम जनता उन्नयन पार्टीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी मुर्शिदाबाद येथे प्रतिबाबरी उभारण्याची घोषणा करत त्याचा भूमिपूजन समारंभही घडवून आणला. यामुळे खळबळ उडाली होती. हुमायू हे प्रत्येक सभेतून ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करत होते. भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी कबीर यांचे हे उद्योग असल्याचा आरोप तृणमूलने आधीच केला होता. आज त्यासंबंधी एक व्हिडिओच दाखवला.
उपमुख्यमंत्री पदाची ऑफर
व्हायरल व्हिडिओमध्ये हुमायू कबीर हे भाजपच्या मदतीने ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्याबद्दल बोलत आहेत. ‘‘विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते माझी दिल्लीतील नेत्यांशी भेट घालून देणार आहेत. आसामचे मुख्यमंत्रीही मला मदत करणार आहेत. भाजप सत्तेत आला तर मला उपमुख्यमंत्री पद देण्याचं आश्वासनही मिळालंय. मी पीएमओच्या संपका&तही आहे,’’ असं कबीर सांगत आहेत.
भाजपवर हल्ला, ईडी चौकशीची मागणी
हुमायू यांच्या व्हिडिओवरून तृणमूल काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला. ‘‘चौकशा, एसआयआर अशा माध्यमातून भाजप आम्हाला रोखू शकत नाही. त्यामुळं त्यांनी धार्मिक भावनांची सौदेबाजी सुरू केली आहे. हे लज्जास्पद आहे. मुस्लिम मते पह्डण्यासाठी भाजपनं ‘बी’, ‘सी’ टीम तयार केल्या आहेत, ते हुमायूचा वापर करत आहेत. या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला आहे. ईडीने याची चौकशी करावी. पंतप्रधान कार्यालयातील कोणत्या नेत्याबद्दल हुमायू बोलत आहेत याचीही चौकशी करावी, अशी मागणी तृणमूलने केली.


























































