
मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती महेश सोनक यांची मेघालय व झारखंड न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलीजियमची आज बैठक झाली त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे या मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती असून पुणे येथे 17 एप्रिल 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. सिम्बायोसीस येथून त्यांनी एलएलबी पूर्ण केले तर कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी एलएलएम पूर्ण केले. त्यानंतर त्या त्यांच्या वडिलांच्या ज्येष्ठ वकील विजयराव ए. मोहिते यांच्या चेंबरमध्ये रुजू झाल्या. त्यांनी मुंबईतील बॅरिस्टर राजा भोसले यांच्या चेंबरमध्ये काम केले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी, दिवाणी आणि घटनात्मक बाजूने वकिली केली आणि महाराष्ट्र सरकारसाठी सरकारी वकील आणि विशेष सरकारी वकील म्हणूनही काम केले, त्यानंतर 21 जून 2013 रोजी त्यांची उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली तर 2 मार्च 2016 रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायमूर्ती करण्यात आले.
न्यायमूर्ती महेश सोनक हे मुंबई उच्च न्यायालयातील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत, त्यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1964 रोजी झाला. गोव्यातील पणजी येथील एम.एस. कॉलेज ऑफ लॉमधून एलएलबी पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1988मध्ये वकील म्हणून नोंदणी केली आणि उच्च न्यायालयाच्या पणजी (गोवा) खंडपीठात वकिली केली. त्यांनी दिवाणी, घटनात्मक, कामगार, सेवा, पर्यावरण आणि कर-संबंधित प्रकरणांमध्ये काम केले. विविध महामंडळांचे विशेष वकील म्हणूनही काम केले. गोव्यातील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सर्वात वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केले.



























































