मोदींच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाके; उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात झंझावात, सभांना लोटला प्रचंड जनसमुदाय

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांपासून सगळेच ‘भाजप’च्या गाडीत मिंधे-भाजपकडून सत्तेचा गैरवापर करून शिवसैनिकांना त्रास देण्याचे कारस्थान सुरू आहे. कारण त्यांची युती सीबीआय, ईडी आणि पोलिसांसोबत आहे. यातूनच शिवसैनिकांना तडीपार करण्याचे प्रकार सुरू आहेत. यासाठी सगळी यंत्रणा वापरली जात आहे. मात्र लक्षात ठेवा 20 नोव्हेंबरला जनता तुम्हा तिघांनाही तडीपार करून टाकेल.

भ्रष्टाचारमुक्त देश करण्याच्या नावाखाली मते मागून सत्तेत आलेल्या भाजपमध्ये प्रत्यक्षात मात्र अजित पवारांपासून सर्वच ‘भ्रष्टाचारी’ भाजपच्या ‘गाडी’त बसले आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे दाऊदशी व्यवहार असल्याचे खुद्द मोदींनी जाहीर केले असताना तेदेखील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. भाजपमध्ये आले आणि साधू-संत झाले अशीच भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोदींच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाके लागल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱयाने प्रचाराचा झंझावात निर्माण झाला आहे.

मराठवाडय़ात लोहा-पंधार मतदारसंघातील एकनाथ पवार आणि कळमनुरी मतदारसंघातील डॉ. संतोष टारफे तसेच हिंगोली मतदारसंघातील रूपाली पाटील-गोरेगावकर आणि वसमत मतदारसंघातील जयप्रकाश दांडेगावकर तसेच परभणी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. राहुल पाटील, गंगाखेड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम, पाथरी मतदारसंघाचे उमेदवार सुरेश वरपूडकर, जिंतूर मतदार संघाचे विजय भांबळे या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. लोहा पंधार या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे-भाजप सरकारची अक्षरशः सालटीच काढली. आनंदाच्या शिध्यात चक्क उंदराच्या लेंडय़ा सापडण्याचा प्रकार किळसवाणा असून असले कुजके विचार असलेली माणसे आपल्याला चालणार नाहीत, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकशाही न वाचवताच निवृत्त झाल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. मात्र आता जनतेच्या न्यायालयात खरा न्याय मिळेल, जनता गद्दारीचा सूड घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर तो हात जागेवर राहणार नाही

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सरकारच्या आशीर्वादाने सर्वत्र गुन्हेगारी सुरू आहे. लोहा पंधारमध्येही असाच प्रकार घडला असून सोशल मीडियावर शिवसेनेचा प्रचार केला म्हणून मिंधे-भाजपच्या कार्यकर्त्यांनी निष्ठावान शिवसैनिकावर भ्याड हल्ला केला. मात्र लक्षात ठेवा आता दहा दिवसांतच आमचे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. तेव्हा शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तर तो हात जागेवर राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच मनात आणले तर आताही हल्लेखोर गद्दारांना जागेवर ठेवणार नाही. हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवून समोर या. आम्ही षंढ नाही. मात्र सध्या आतताईपणा करणार नाही. शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे की, कुणाच्या अंगावर स्वतःहून जायचे नाही, मात्र कुणी अंगावर आले तर त्याला सोडायचेही नाही, याची आठवणही त्यांनी करून दिली.

गद्दारांच्या हातात महाराष्ट्र देणार नाही

गद्दारांनी आधी पक्ष चोरला, निशाणी आणि नावही चोरले. आता मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे केले जात आहेत. अशा गद्दारांच्या हातात महाराष्ट्र देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांना केवळ खुर्चीची खाज आहे. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्र लुटण्याचाच प्रयत्न केला. महाराष्ट्रामधील बेरोजगारांच्या हाताला काम देणारे मोठमोठे उद्योग गुजरातला पळवले. मात्र आता त्यांना मतांची आठवण झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळेच आता मोदी-शहा वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. मात्र मोदी-शहांच्या हातात महाराष्ट्र देणार नाही. महाराष्ट्र द्रोह्यांना धडा शिकवायचा आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देणारेच हल्ले करीत आहेत. मात्र आता आम्ही तुम्हाला राजकारणातून कापून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

खरा काळोख भाजपात

एक तर सध्या तुमचा पक्ष फुटत चालला आहे. शंभर वर्षे झालेल्या आरएसएसचे पक्षावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे या कारणासाठी पक्ष वाढवला का, असा सवालही त्यांनी केला. सद्यस्थितीत खरा काळोख भाजपमध्ये आहे. त्यामुळेच आमच्या उरावर त्यांची माणसे बसवण्याचा प्रकार सुरू आहे. विजयाची खात्री नसल्यानेच आता कर्जमाफी, महिलांना मदत, सुरक्षा अशी आश्वासने मिंधे-भाजपकडून दिली जात असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकार दारी आले की लाथ घाला!

सोयाबीन, कापूस, डाळींचे भाव पडलेत. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे, पण सरकार मात्र मतांसाठी दारोदारी फिरत आहे. आपले सरकार चांगले चालले होते. का पाडले सरकार? कोविडच्या काळात महाराष्ट्र सरकारचे काम देशात अक्वल होते. मी घरात बसून होतो अशी कावकाव बाजारबुणगे करतात. पण मी घरात बसून लोकांची घरे सांभाळली. घरे फोडण्याचे पाप केले नाही. हे घरफोडे आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. माझे सरकार असताना मी कोणतेही काम अडवले नाही. ज्याला जे पाहिजे ते दिले. पण तरीही यांचे पोट भरले नाही. ‘जाऊ तिथे खाऊ’ असा यांचा सगळा मामला, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
नखे घेतली, पण वाघ…!

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यात आम्ही छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधणार. हे केवळ मंदिर नसेल तर ते संस्कारपीठ असेल. छत्रपती शिवराय आमचा श्वास आहे. आमचा आदर्श आहे. सुधीर मुनगंटीवारांनी नखे घेतली, पण त्यामागचा वाघ! त्याला अर्थ आहे. नुसत्याच नखांना काही अर्थ नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भोकांड पसरून रडला अन् ग्लास नाचवत तिकडे गेला!

मी एका क्षणात ‘वर्षा’ सोडण्याचा निर्णय घेतला. फेसबुक लाईव्ह केले आणि मी निघालो. मला कोरोना झाला होता. हा गद्दार गाडीच्या खिडकीत भोकाड पसरून रडला, ‘साहेब मी तुमच्या बरोबर आहे, म्हणाला. त्यानंतर दुसऱया दिवशी ग्लास नाचवत तिकडे गेला… अशा शब्दांत कळमनुरी येथे भरसभेत उद्धव ठाकरे यांनी गद्दार संतोष बांगरची लक्तरे वेशीवर टांगली. याची पापे मला नंतर कळली. अनेकदा ‘साहेब, मला वाचवा’ अशी गयावया करायचा. त्याला वाचवलेही. सगळे काही देऊनही याने माती खाल्ली, असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा जोरदार घोषणा दिल्या. आपले सरकार येताच गद्दाराला जेलमध्ये टाकणारच, पण त्याला मदत करणाऱयांनाही सोडणार नाही, असा खणखणीत इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. जनतेला छळणारा हा नालायक शिवसैनिक असूच शकत नाही, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

भाजपला सोडले, बाळासाहेबांचे विचार नाही!

मी बाळासाहेबांचे विचार सोडले अशी कोल्हेकुई मोदी, शहा करत आहेत. मी भाजपला सोडले, बाळासाहेबांचे विचार नाही! भाजपची पालखी वाहणे म्हणजे बाळासाहेबांचा विचार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपने आपल्याला अनेक वर्षे फसवले. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, तुमचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. मुस्लिम सोबत येत असल्याचे पाहूनही यांना पोटशूळ उठला आहे. पण आमचे हिंदुत्व हे दंगली भडकावणारे नाही. भाजपचे हिंदुत्व घरे पेटवणारे आहे. चूल पेटवण्यात अपयशी ठरले म्हणून आता मोदी-शहा लोकांची घरे पेटवण्याचे दुःस्वप्न पाहताहेत. हा बाळासाहेबांचा विचार नाही, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे… वगैरे सब झूठ आहे. देशात फक्त एकच सेफ आहे, अदानी! भ्रष्टाचारी सेफ आहेत. आम्ही एक आहोत आणि सेफ आहोत, आता तुम्हालाच साफ करणार आहोत, असा पलटवार यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे

मतांसाठी महिलांना पंधराशे रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे ते म्हणाले. पंधराशे दिले, पण महिलांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही त्यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारणार असून यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी असतील अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

मराठवाड्यातील गद्दारीच्या तणावर तसेच गुंडगिरीवर नांगर फिरवणारच, पण यापुढे एकाही शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा! तो हात मुळासकट उखडून टाकू.

जय शहा आयसीसीचा अध्यक्ष कसा झाला?

आपल्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी सांगावे की, हातात बॅट न धरता तुमचा मुलगा आयसीसीचा अध्यक्ष कसा झाला? हिंमत असेल तर जय शहा याने महाराष्ट्रातील कोणत्याही तरुणासोबत क्रिकेट खेळून दाखवावे पिंवा बॉलिंग करून विकेट काढून दाखवावी, असे आव्हानच त्यांनी दिले. शहा यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावे त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे की नाही? स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱयाचे पाहावे वाकून असाच हा प्रकार आहे. मला ही घराणेशाही मंजूर आहे, असे ठणकावून सांगतानाच थोडीफार लाज शिल्लक असेल तर स्वतःच्या बापाचे फोटो लावा, असे आव्हानच त्यांनी दिले.

महाराष्ट्राचे वैभव हय़ांना गुजरातला न्यायचे आहे

‘मुन्नाभाई आणि सर्किट’ महाराष्ट्र लुटायला आलेत. राज्यभर वणवण करताहेत. सोयाबीन, कापूस, डाळींना भाव नाही. तरुणांच्या हाताला काम नाही, पण मोदी, शहांना त्याच्याशी काही सोयरसुतक नाही. महाराष्ट्राचे वैभव ओरबाडून यांना गुजरातला न्यायचे आहे. पण याद राखा, तुमच्या या नापाक इराद्यामध्ये शिवसेना पोलादी भिंत बनून उभी राहणार, असा सणसणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

ओवाळणीची किंमत करताहेत, लाज वाटत नाही?

महिलांना पंधराशे रुपये देऊन ओवाळणीची किंमत करता, जाहिरातबाजी करता… लाज वाटत नाही? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांची खरडपट्टी काढली. सगळे संस्कार पुसण्याचे काम हे नतद्रष्ट करत आहेत. पंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम चालू आहे. कामेच सुरू नाहीत, मग हे पैसे कुठे जात आहेत.

महाराष्ट्रात फक्त ठाकरेंचीच गॅरंटी चालते!

निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे मिंधे-भाजपकडून खोटी आश्वासने देऊन प्रचार सुरू आहे. प्रचारादरम्यान लावण्यात येणाऱया बॅनरवर मोदी पिंवा शहांचा फोटो दिसत नसला तरी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पह्टो झळकत आहे. कारण महाराष्ट्रवासीयांचा मोदी-शहांवर विश्वास राहिलेला नाही. कारण महाराष्ट्रात केवळ ठाकरेंची गॅरंटी चालते, मोदी-शहांची सडकी, नासकी, गळकी गॅरंटी चालत नाही.