
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत आक्रमक रुप आज शिवसैनिकांनी पाहिले. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे आक्रमक झाले होते. खोट्या केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते अक्षरशः तुटून पडले. आता एक तर तू राहशील किंवा मी, असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला. कुणी हात उगारला तर हातच जागेवर ठेवायचा नाही, बिनधास्तपणे अंगावर चालून जा, असे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले.
आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पुन्हा विजयाचा भगवा फडकवायचा असा निर्धार केला. pic.twitter.com/QzHParnC6W
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 31, 2024
शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. फडणवीस यांनी मला आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात डांबण्याचा डाव रचला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. यापुढे मात्र गप्प रहायचे नाही. लढाईला तोंड फुटताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हर हर महादेव म्हणत शत्रूवर तुटून पडायचे. तसे आपल्यावर येणाऱ्या शत्रूवर आता तुटून पडायचे, असे उद्धव ठाकरे म्हणताच रंगशारदा सभागृह छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी दुमदुमले. खुद्द उद्धव ठाकरे यांनीच आदेश दिल्याने शिवसैनिकांमध्येही एक वेगळेच चैतन्य संचारल्याचे यावेळी पहायला मिळाले.