
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावून हिंदुस्थानवर दबाव टाकला आहे. ट्रम्प यांच्या या धोरणावर अर्थसंकल्पातून काही ठोस उपाययोजनेची अपेक्षा होती. मात्र, तसे करण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे. उलट काही घोषणा पाहता ट्रम्प यांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
अनेक गोष्टींवरील आयातशुल्क संपूर्णपणे हटविले आहे किंवा त्यात कपात केली आहे. ही आयात प्रामुख्याने अमेरिकेतून होते. एरोस्पेस, अणुऊर्जा तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे इत्यादींवर आयात शुल्क पूर्णपणे हटवण्यात आले आहे. त्यात एक्स-रे टय़ुब, डायग्नोस्टिक उपकरणांचे पॅनेल इत्यादींवर आयात शुल्क लागणार नाही. याशिवाय मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हिडीओ गेमशी संबंधित कच्चा माल इत्यादींवरील आयात शुल्क संपविले आहे. देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी हा निर्णय घेतल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, कच्चा माल हा अमेरिकेतूनच येतो. त्यामुळे या तरतुदी पाहता ट्रम्प यांना खूश करून अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यासाठी सरकारचे प्रयत्न दिसत आहेत.
























































