
अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंत्रालय परिसरात आत्मक्लेश आंदोलन केले. धरणग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांची भेट मागणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना मंत्रालय परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप या धरणग्रस्तांनी केला आहे. आमच्या जमिनीच्या बदल्यात आम्हाला अशी वागणूक जर भेटत असेल तर हे सरकार षंढ आहे. सरकारची ही दडपशाही आहे. आम्ही शांततेच्य़ा मार्गाने आलो होतो. आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता. परंतु पोलीस आम्हाला जबरदस्तीने येथून घेऊन जात आहे. हे योग्य नाही. जर हे असच करत राहिले तर याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला कोणताही संघर्ष नकोय. ही आमची भूमीका आहे. असे शेतकऱ्यांनी म्हंटले आहे.
‘आमचा एक सहकारी आत्महत्या करून गेला. त्याबद्दल यांना काहीच दु:ख नाही. आमच्या आत्महत्या केलेल्या सहकऱ्याला न्याय द्या आणि आमच्या मागण्या मान्य करा. अशी मागणी यावेळी या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. आंदोलनाला एक वर्ष होत आलं तरी धरणग्रस्त आंदोलकांना कोणत्याही न्याय मिळाला नसल्याचं आंदोलकांचे म्हणणं आहे. दरम्यान पोलिसांनी या आंदोलनकर्यांना ताब्यात घेतले असून त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे.