मुंबईत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेकडून रेल्वेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. हे वेळापत्रक 12 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. वेळापत्रकात 12 नव्या फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर 12 डब्ब्यांच्या 10 लोकलचे अपडेशन करण्यात आले असून त्या आता 15 डब्यांसह धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सुरू असणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांची संख्या 1394 वरून 1406 पर्यंत वाढणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली येथून चर्चगेटसाठी एक स्लॉट लोकल सुरू करण्यात येणार आहे. विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते नालासोपारा अशी जलद लोकल नव्याने सुरू होणार आहे. चर्चगेट ते गोरेगाव अशा दोन धिम्या लोकल चालवल्या जातील. तर, डहाणू रोड ते विरारपर्यंत दोन स्लो लोकल चालवल्या जातील. तसेच चर्चगेटपासून अंधेरीपर्यंत एक स्लो लोकल चालवली जाईल. विरार ते डहाणू रोडपर्यंत दोन धिम्या लोकल चालवल्या जाणार आहेत.
गोरेगाव ते कांदिवलीपर्यंत सहावी मार्गिका उभारण्याचं काम सध्या सुरू असल्यामुळे ते पूर्ण झाल्यावरच हे वेळापत्रक लागू होईल. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी राम मंदिर ते मालाड स्थानकादरम्यान लोकलचा वेग 30 किमी प्रतितास करण्यात आला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होत असून 4 ऑक्टोबरपर्यंत दररोज 150 ते 175 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.