
विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरलेल्या हिंदुस्थानी संघाने आता महिला हॉकी विश्वचषक पात्रता स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, शुक्रवारी होणाऱया उपांत्य फेरीत हिंदुस्थानपुढे इटली संघाचे आव्हान असेल.
‘ब’ गटात हिंदुस्थानने तीन सामन्यांत सात गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. स्कॉटलंडचेही सात गुण होते, मात्र गोल सरासरीत मागे राहिल्याने त्यांना दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. आगामी महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा 15 ते 30 ऑगस्टदरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये खेळवली जाणार आहे. गट फेरीत हिंदुस्थानने दोन सामने जिंकले, तर एक सामना बरोबरीत सुटला. इटलीने ‘अ’ गटातून एक विजय, एक बरोबरी आणि एक पराभव अशी कामगिरी करत दुसरे स्थान मिळवले. हिंदुस्थानसाठी आघाडीची खेळाडू नवनीत काwर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, तिने आतापर्यंत चार गोल केले आहेत. वेल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तिने हॅट्ट्रिकही झळकवली.
इटलीची मदार फेडेरिका कार्टा हिच्यावर असेल. दोन्ही संघांमध्ये 2012 पासून आतापर्यंत सात सामने झाले असून, त्यापैकी पाच सामने हिंदुस्थानने जिंकले, एक सामना इटलीने जिंकला, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
दरम्यान, हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक सोएर्ड मारिज्ने यांनी सांगितले की, विश्वचषकासाठी पात्र ठरणे ही संघासाठी मोठी उपलब्धी आहे. मात्र, संघ केवळ पात्रता मिळवण्यासाठी नाही, तर स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरला आहे. उपांत्य पेरीत इटलीकडून कडवी झुंज अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.




























































