
हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक उत्साहात आणि मराठमोळ्या थाटात करण्यासाठी वरळीत भव्य गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने ‘आम्ही वरळीकर’ आयोजित शोभायात्रेचे यंदाचे सोळावे वर्ष आहे. ही यात्रा अधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी आयोजकांकडून मराठी शाळा रिल्स स्पर्धेसह विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
जांबोरी मैदान, डॉ. जी. एम. भोसले मार्ग, वरळी येथून गुरुवारी सकाळी 7.30 वाजता या शोभायात्रेला सुरुवात होईल. यंदाची गुढी महिलांच्या हस्ते उभारण्यात येणार आहे. त्यानंतर विश्वशांती प्रार्थना व शालेय विद्यार्थ्यांच्या सामूहिक महाराष्ट्र गीतांनी शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, जव्हार येथील तारफा नृत्य, आकर्षक गुढय़ा आणि विविध सांस्कृतिक देखावे असे विविध उपक्रम या शोभायात्रेदरम्यान सादर करण्यात येणार आहेत. याशिवाय ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य चित्ररथ, बाईक रॅली, साई पालखी सोहळ्याची मिरवणूक, वारकरी भक्तिमय गजर, लेझीम पथक आणि भव्य ढोल पथक यामुळे शोभायात्रेला विशेष रंगत येणार आहे. वरळीतील सर्व नागरिकांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात, डोक्यावर फेटे परिधान करून आणि भगवा ध्वज घेऊन शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कदम आणि सरचिटणीस महेश खवणेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शिवसह्याद्री वरळी फेसबुकवर अथवा 88791 11118 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
मराठी भाषा, शाळांविषयी जनजागृती
मराठी भाषा आणि मराठी शाळांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मराठी शाळा’ या विषयावर भव्य रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन अभिवादन करण्यात येणार आहे.





























































