मुंबई विद्यापीठाच्या गाडय़ांचा वापर कॅन्टीनच्या कामासाठी – युवासेनेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि प्र. कुलगुरूंच्या दोन गाडय़ांचा लिलाव करा आणि त्याचे पैसे विद्यापीठाने घ्यावेत. कारण या गाडय़ा विद्यार्थ्यांच्या पैशातून आले आहेत, अशी मागणी युवासेनेकडून वारंवार करण्यात आली होती. मात्र लिलाव न केल्याने आता या दोन्ही गाडय़ांचा  कॅन्टीनच्या कामासाठी वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार युवासेनेने समोर आणला आहे.

मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू व प्र. कुलगुरू यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कातून खरेदी करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 या वर्षी झाल्यामुळे विशेष क्रमांक असलेली गाडीसुद्धा प्रशासनाच्या अनास्थेमुळे बंद ठेवून कॅन्टीनच्या वापराकरिता ठेवली आहे का? असा सवाल विचारत युवासेना सिनेट सदस्यांनी कुलसचिव प्रसाद कारंडे यांना प्रत्यक्ष दुरवस्थेत उभी असलेली गाडी दाखवली.

प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

मुंबई विद्यापीठ अर्थसंकल्पीय अधिसभा (सिनेट) अधिवेशन शनिवारपासून सुरू झाले आहे. युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचडे, परमात्मा यादव, मयूर पांचाळ, किसन सावंत आणि स्नेहा गवळी यांनी मागील अनेक वर्षांपासून केलेल्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. मुंबई विद्यापीठाला 1200 कोटी कधी देणार, सर्व उपकेंद्र विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार का, तरण तलाव परिपूर्ण कधी होणार, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कधी पूर्ण होणार, अशा प्रलंबित मागण्यांचे फलक हातात धरत युवासेनेने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रशासनाचे लक्ष वेधले.