अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आनंदच! जयंत पाटलांची गुगली

राजकारण करणाऱ्या प्रत्येकाची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते; परंतु ही संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. अशा परिस्थितीत अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, अशी गुगली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टाकली. जयंत पाटील यांच्या या नव्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अधिक जवळ आल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे छत्रपती संभाजीनगरात आले होते.

अलिकडेच ‘आपल्याला मुख्यमंत्रीपद खुणावते, पण संधीच मिळत नाही…’ असे विधान केले होते. याबद्दल पत्रकारांनी जयंत पाटील यांना छेडले असता त्यांनी राजकारण हे खुल्या मनाने करायचे असते. पाच वर्षे आमचा कोणाचा विषयच नाही, सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर आम्हाला आनंदच आहे, मी त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केले आहे, असे सांगितले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, विश्वजित चव्हाण, सुधाकर सोनवणे, मोतीलाल जगताप आदींची उपस्थिती होती.

मी माझ्या पक्षात आनंदी आहे

जयंत पाटील यांनी मी जेथे आहे तेथे आनंदी आहे, असे सांगून त्यांच्या पक्षांतराबद्दल होत असलेल्या चर्चेला विराम दिला. लोकसभेत आमच्या पक्षाला चांगले यश मिळाले. परंतु विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नाही. पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाच पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्वपक्षीयांनी पंतप्रधानांना पाठिंबा दिला असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अविवेकीपणामुळे लाडक्या बहिणींची फसवणूक

राज्यासमोर आर्थिक संकट आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला असताना, जयंत पाटील म्हणाले, कुठलाही विचार न करता आश्वासने देण्यात आली. त्यामुळे राज्यासमोर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणीची फसवणूक झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. आदिवासी, समाजकल्याण विभागाचा निधी अन्यत्र वळवता येत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.