>> धनंजय साठे
गाण्याचे रेकॉर्डिंग म्हणजे आठवणीत राहणारा प्रसंग. यानिमित्त गाण्याचे शब्द, चाली ते अगदी गायक यांच्यासोबतचा प्रवास अनुभवता आला. स्टार प्लस वाहिनीवरील मालिकांच्या शीर्षकगीतानिमित्त अलका याज्ञिक, कुमार सानू, प्रीतम, सुनिधी आणि शान यांच्याशी ऋणानुबंध तयार झाले. मोठे कलाकार मोठे का असतात याचा प्रत्यय देणारेच हे किस्से आहेत.
आजसुद्धा आपण गाण्याच्या भेंडय़ा खेळतो तेव्हा पटकन पूर्वीचीच गाणी डोक्यात येतात. असं का घडत असेल याचा विचार केला तर पूर्वीच्या गाण्याचे शब्द किती अर्थपूर्ण होते. सूर, ताल आणि गाण्याच्या सुरेख चालींमुळे प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला गोडवा हा या गाण्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती. मग ते ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’ असो किंवा ‘सांग कधी कळणार तुला’ किंवा ‘आभाळमाया’, ‘अवंतिका’, ‘वादळवाट’ अशा लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत असो, ही गाणी जनसामान्य प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात घर करून बसली आहेत. इतक्या वर्षांनंतरसुद्धा या गाण्यांची शेल्फ लाइफ आजही टिकून आहे.
सध्याची गाणी स्मृतीआड पटकन का होऊन जातात? विचारमंथन करण्यासारखा मुद्दा आहे. याअनुषंगाने मला माझ्या आजवरच्या कारकीर्दीतल्या दोन घटना आपल्याबरोबर शेअर कराव्याशा वाटतात. पहिली घटना होती जेव्हा मी नीना गुप्ता यांच्या निर्मिती संस्थेमध्ये कामावर नुकताच रुजू झालो होतो. तेव्हा स्टार प्लस वाहिनीवर बहुचर्चित आणि नंतर अतिशय लोकप्रिय झालेली मालिका ‘सोनपरी’चा जन्म झाला होता. त्या मालिकेचं शीर्षक गीत कोणी गायचं यावर वाहिनीमधले अधिकारी, नीना गुप्ता, मालिकेचे दिग्दर्शक भूषण पटेल यांच्यात चर्चा चालायची. शेवटी असं ठरलं की, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्या स्टुडिओमध्ये शीर्षक गीत ध्वनिमुद्रित करायचं. तेव्हा हे निश्चित नव्हतं की, त्या स्वत गाणार आहेत की नाही. त्या काळात त्यांच्या स्टुडिओबद्दल खूप चर्चा असायची. त्यामुळे आमचं ठरलं की, अलकाजींच्या स्टुडिओमध्ये ‘सोनपरी’च्या शीर्षक गीताचं ध्वनिमुद्रण करायचं. तो दिवस उजाडला. आजही तो दिवस मला डोळ्यांसमोर दिसतो. आम्ही काही ठरलेली मंडळी स्टुडिओमध्ये पोहोचलो. अलकाजी स्वत उपस्थित होत्या. चहा-नाश्ता संपल्यावर सगळे कामाला लागले. आधी संगीत दिग्दर्शकाने बनवलेली चाल अलकाजींना ऐकवली. त्यांना ती चाल खूप आवडली आणि त्यांनी स्वतहून शीर्षक गीत गाण्याची इच्छा दर्शवली. आम्हाला तर अत्यानंद झाला होता. त्यांनी चक्क तासाभरात गाणं ध्वनिमुद्रित केलं आणि काही कामानिमित्त बाहेर गेल्या. मिक्सिंग वगैरे झालं आणि अतिशय गोड असं शीर्षक गीत तयार झालं. संध्याकाळी नीना गुप्ता स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांनी अलकाजींना धन्यवाद दिले. खूप वाजवी दरात आमचे ध्वनिमुद्रण संपन्न झालं होतं.
पुढे काही महिन्यांनंतर आम्ही शीर्षक गीताचे अजून एक व्हर्जन वाहिनीच्या सल्ल्याने बनवलं. तेही उत्तम रीत्या पार पडलं. हे दुसरं व्हर्जन हिंदी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय गायक कुमार सानूच्या स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित करण्यात आलं. सना साऊंड हे कुमार सानूच्या स्टुडिओचं नाव. त्यांच्या मुलीच्या नावावरून स्टुडिओचं नाव ठेवलं आहे.
दुसरी घटना आहे ‘क्यूं होता है प्यार’ या मालिकेच्या शीर्षक गीताच्या वेळेचं. ही मालिका पण स्टार प्लसवरच प्रदर्शित झाली. संगीतकार होते आजचे आघाडीचे संगीतकार प्रीतम!
त्या वेळेला आमच्या सोयीने आम्ही प्रीतमला आमच्या ऑफिसमध्ये बोलावून घ्यायचो आणि त्याला उशीर झाला की, मी त्याची चांगलीच चंपी करायचो. नवीन होता. बिचारा माझं बोलणं ऐकून घ्यायचा. उत्तम गिटार वाजवायचा प्रीतम. एकदा चाल ठरल्यावर पुन्हा गायक व गायिका कोण? ही चर्चा सुरू झाली. तरुण-तरुणीची गोष्ट होती. त्यामुळे शीर्षक गीत तशाच पठडीतलं बनवलं गेलं होतं. एकदम उडत्या चालीचं. या गाण्याला न्याय देतील असे गायक-गायिका निवडायचे होते. त्या काळातले स्टार्स शान आणि सुनिधी चौहान यांची निवड झाली. ध्वनिमुद्रणाचा दिवस ठरला. मला ऑफिसमध्ये काम होतं म्हणून मी स्टुडिओला जाऊ शकलो नाही. प्रीतम आणि सुनिधी पोहोचले, पण शानचा पत्ता नव्हता. थोडय़ा वेळाने प्रीतमचे फोन सुरू झाले. प्रीतम बोलताना किंचित अडखळत बोलतो. टेन्शनमध्ये तर ते अडखळणं जास्तच वाढायचं. आता आठवण काढून हसू येतंय, पण तेव्हा प्रीतमसोबत मीही टेन्शनमध्ये यायला लागलो. कारण शानचा फोन रिंग होत होता, पण तो उचलत नव्हता. जवळपास तासभर शानचा शोध चालला होता. तोपर्यंत सुनिधीकडून प्रीतमने तिचं गाणं गाऊन घेतलं. शेवटी शानच्या घरचा पत्ता शोधून काढला आणि आमच्या ऑफिसबॉयला मी त्याच्या घरी रवाना केलं. सुदैवाने तो अंधेरीमध्येच राहायला होता.
आमचा ऑफिस बॉय शानच्या घरी पोहोचला तर त्याच्या नोकराने दार उघडलं आणि सांगितलं की, साहेब झोपलेत. रात्रभर रेकॉर्डिंग करून घरी उशीरा पोहोचल्याने तो झोपून गेला होता बिचारा! पण तो अतिशय प्रोफेशनल कलाकार असल्याने पटकन चेहऱयावर पाण्याचे हबके मारून लगेच निघाला आणि स्टुडिओच्या दिशेने रवाना झाला. ही माहिती मिळताच मी तत्परतेने प्रीतमला कळवलं. त्याच्या जीवात जीव आला. कारण स्टुडिओचं बुकिंग मीटर पण चालू होतं. शानने स्टुडिओत एन्ट्री घेतली आणि उपस्थितांना मनापासून ‘सॉरी’ म्हणून चाल ऐकायला सुरुवात केली. शान इतका हरहुन्नरी कलाकार आहे की, दीड तासात त्याने अख्खं गाणं पूर्ण केलं. “वाह उस्ताद वाह!’’ इतकेच उद्गार स्टुडिओत उमटले.
असे अनेक किस्से मी अनुभवत आलेलो आहे. पुढच्या वेळी असेच भन्नाट किस्से घेऊन येईन.