>> दुष्यंत पाटील
एकाच वेळी अनेक मेलडीज येणारं पॉलिफोनिक संगीत बरॉक कालखंडात मोठय़ा प्रमाणात बहरलं. पॉलिफोनिक संगीतात येणारा सर्वात महत्त्वाचा संगीत प्रकार म्हणजे फ्यूग. या संगीतात एका आवाजातील थीम संपते तेव्हा दुसऱया आवाजात तीच थीम सुरू होते. फ्यूग संगीताला शिखरावर नेलं ते बाख या संगीतकारानं. बाखच्या ‘वेल टेम्पर्ड क्लॅव्हिएरा’च्या दोन्ही भागांमध्ये तसंच ‘दि आर्ट ऑफ फ्यूग’मध्ये येणारं फ्यूग संगीत आजही प्रचंड आवडीनं ऐकलं जातं.
हेमोफोनिक संगीत आणि पॉलिफोनिक संगीत यातला फरक आपण याआधी पहिला. होमोफोनिक संगीतात एका वेळी एकच मेलडी ठळकपणे ऐकू येते तर पॉलिफोनिक संगीतात एकाच वेळी अनेक मेलडीज येतात. बरॉक कालखंडात पॉलिफोनिक संगीत मोठय़ा प्रमाणात बहरलं. पॉलिफोनिक संगीतात येणारा सर्वात महत्त्वाचा संगीत प्रकार म्हणजे फ्यूग.
पाश्चात्त्य संगीतातला ‘फ्यूग’ हा शब्द मूळच्या ‘फ्युगा’ या लॅटिन शब्दापासून आला आहे. लॅटिन भाषेत ‘फ्युगा’ या शब्दाचा अर्थ ‘पळून जाणे’ किंवा ‘सुटका’ असा होतो. फ्यूग संगीतात एकच थीम वेगवेगळ्या आवाजांमध्ये येते. एका आवाजातील थीम संपते तेव्हा दुसऱया आवाजात तीच थीम सुरू होते. म्हणजे एका अर्थानं दुसऱया आवाजामध्ये थीम सुरू होते तेव्हा पहिल्या आवाजातली थीम पुढे पळून गेलेली असते.
फ्यूग संगीत नेमकं कधी सुरू झालं? प्रबोधन काळात (रेनेसाँस) आणि बरॉक कालखंडाच्या सुरुवातीला संगीतकार पॉलिफोनिक संगीतात नवनवीन प्रयोग करायला लागले. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ‘फ्यूग’ हा शब्द संगीत रचनांसाठी वापरला जाऊ लागला. सुरुवातीला गॅब्रिअलीसारख्या संगीतकारांनी फ्यूगसारख्या संगीत रचना केल्या, पण खऱया अर्थाने फ्यूग संगीताला शिखरावर नेलं ते बाख या संगीतकारानं. बाखच्या ‘वेल टेम्पर्ड क्लॅव्हिएरा’च्या दोन्ही भागांमध्ये तसंच ‘दि आर्ट ऑफ फ्यूग’मध्ये येणारं फ्यूग संगीत आजही प्रचंड आवडीनं ऐकलं जातं.
‘फ्यूग’ रचनेमध्ये ढोबळमानानं तीन भाग असतात. पहिल्या भागाला ‘एक्स्पोझिशन’ असं म्हणतात. यात सुरुवातीला एका आवाजामध्ये एक थीम येते. या पहिल्या आवाजातली थीम संपते तेव्हा तीच थीम दुसऱया आवाजात येते, पण या वेळी ती वेगळ्या पट्टीत येते. पहिल्या आवाजात येणाऱया थीमला ‘सब्जेक्ट’, तर दुसऱया आवाजात येणाऱया थीमला ‘अॅन्सर’ असंही म्हणतात. ज्या क्षणी पहिल्या आवाजातला ‘सब्जेक्ट’ संपतो आणि दुसऱया आवाजात ‘अॅन्सर’ सुरू होतो तेव्हा पहिल्या आवाजात वेगळी थीम सुरू होते. याला ‘काऊंटर सब्जेक्ट’ असंही म्हणतात. अशाच प्रकारे पुढे हे संगीत सुरू राहते. ‘फ्यूग’मध्ये एकापेक्षा जास्त कितीही जास्त आवाज येऊ शकतात. बहुतेक वेळा ही आवाजाची संख्या तीन ते पाच असते. शेवटच्या आवाजात आलेली थीम संपली की,‘एक्स्पोझिशन’ हा भाग संपतो. ‘एक्स्पोझिशन’नंतर फ्यूग रचनेत ‘डेव्हलपमेंट’ हा भाग सुरू होतो. या भागात संगीतकार मुक्तपणे आपली कल्पकता वापरतो. फ्यूगच्या शेवटच्या भागात पुन्हा एकदा मूळची थीम मूळच्याच पट्टीत नाटय़मय पद्धतीने येते.
वेगवेगळ्या आवाजात संगीत चालू असताना कुठल्याही क्षणी साऱया आवाजांमधला ऐकू येणारा स्वरांचा समूह कर्कश ऐकू येऊ नये यासाठी संगीतकाराला संगीत रचनेचे बरेच नियम पाळावे लागतात. त्यामुळेच ‘फ्यूग’ ही काहीशी गुंतागुंतीची रचना मानली जाते. संगीताच्या इतिहासात फ्यूग हा संगीत प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. फ्यूग प्रकारातलं संगीत रचणं म्हणजे एक अवघड कला मानली जाते. संगीताच्या माध्यमातून भाव व्यक्त करण्याची ‘फ्यूग’ संगीत रचनेत बरीच क्षमता असते असं मानलं जातं. संगीताच्या क्षेत्रात सखोल ज्ञान मिळवण्यासाठी ‘फ्यूग’ रचना करणं विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचं ठरतं. कारण फ्यूग रचना करण्यासाठी हार्मनी, काऊंटर पॉइंट यांचं सखोल ज्ञान असणं आवश्यक असतं. बरॉक कालखंडात बाखसोबत हँडेल आणि पाकलबेल यांनीही उत्कृष्ट फ्यूग रचना केल्या. नंतरच्या काळात बीथोवन, मोत्झार्ट आणि शोस्ताकोविच यांच्यासारख्या संगीतकारांनीही फ्यूग संगीत रचलं.
फ्यूग रचना म्हणजे नेमका काय प्रकार असतो याचा अनुभव घेण्यासाठी आपण यूटय़ूबवर बाखची एखादी फ्यूग रचना एकदा तरी ऐकायलाच हवी!