हॉलिडे एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड; उंबरमाळी ते खर्डी स्थानकादरम्यान लोकल, एक्सप्रेस साडेतीन तास ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या उंबरमाळी ते खर्डी स्थानकादरम्यान अप मार्गावर हॉलिडे एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे आज संध्याकाळी पावणेपाच ते रात्री सव्वाआठपर्यंत साडेतीन तास वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमानी प्रवाशांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

उंबरमाळी ते खर्डी स्थानकादरम्यान अप मार्गावर आज संध्याकाळी हॉलिडे एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे सायंकाळी 5 वाजून 13 मिनिटांची उंबरमाळी स्थानकावरून आणि कसारा येथून 6 वाजून 18 मिनिटांची मुंबईला जाणाऱया लोकलसह अप मार्गावरून धावणाऱया पुष्पक एक्सप्रेस, हरिद्वार एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात उभ्या होत्या तर अन्य मेल-एक्सप्रेसचा तब्बल साडेतीन तास खोळंबा झाला. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येबाबत माहिती दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. त्यानंतर कल्याण व वासिंद येथून इंजिन मागविण्यात आले. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भोंगळ कारभाराबाबत सर्व प्रवासी संघटना आणि प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.